Osmanabad News : शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – राज्यमंत्री संजय बनसोडे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, धीर धरावा. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत देण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम, भूकंप पुनर्वसन, पर्यावरण, रोजगार हमी योजना, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

लोहारा तालुक्यातील करजखेडा येथील अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री बनसोडे यांनी केली. त्या प्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी तहसीलदार गणेश माळी, जिल्हा कृषी अधिकारी उमेश घाटगे, गट विकास अधिकारी दिवाने, भागवत भंडारकर, जगदीश पाटील, जिवन चव्हाण, नंदकुमार क्षीरसागर,शरद चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी लोहारा तालुक्यातील करजखेडा येथील शेतकरी गौतम सदाशिव चव्हाण यांच्या शेतीची व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.

नाल्याच्या प्रवाहामुळे चव्हाण यांच्या शेती मधील जमिनीचा थर वाहून गेल्याचे दिसून आले. तसेच ठिबक सिंचन सेट तसेच टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. त्या अनुषंगाने लोहारा तालुक्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करून या शेतकऱ्यांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.