osmanabad News : अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार – शरद पवार

राज्य सरकारकडून मदतीस काही मर्यादा

0

एमपीसी न्यूज – अतिवृष्टी झालेल्या भागात शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिले नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संपूर्ण राज्य सरकार मदत देण्यास तयार आहे. परंतु यामध्ये केंद्र सरकारनेही मदत देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यातील अतिवृष्टी भागातील सर्व खासदार समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी नुकसानग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्या दरम्यान सांगितले.

तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा व लोहारा तालुक्यातील सास्तुर या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची खासदार शरद पवार यांनी आज रविवार पाहणी केली. यावेळी पवार यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून धीर दिला.


किल्लारीसारख्या महाभयंकर भूकंपावर मात करून उभा राहीलो आहोत. या आस्मानी संकटावर हि आपण मात करू, शेतकरी बांधवांनी धीर धरावा, तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ऊस, सोयाबिन, तूर, मका, उडीद, फळबागांचे खूप मोठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. ऊस क्षेत्राचे नुकसान झाले यासंदर्भात साखर कारखाने लवकर चालू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार शरद पवार यांनी सांगितले.

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आ. ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जिवन गोरे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, नेते संजय निंबाळकर, प्रतापसिंह पाटील, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांच्यासह महाविकासआघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.