Pimpri : ‘देश से हमारा नाता कागज से नही, दिलसे है’ – उमर खालिद

सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात पिंपरीत निषेध महासभा

एमपीसी न्यूज – शिक्षणाची कागदपत्रे मागितल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसले होते. आता जनतेकडून कागदपत्रे मागत आहेत. आम्ही कागदपत्रे देणार नाहीत. एनपीआर मान्य करणार नाहीत. देश से हमारा नाता कागज से नही, दिलसे है’, असे जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याने सांगितले.  तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही धर्मात भेदभाव केला नाही. महाराज धर्मनिरपेक्ष होते. त्यांच्या सैन्यात मुस्लिम देखील होते असे सांगत शहीद हेमंत करकरे यांना भारतरत्न देण्याची मागणीही त्याने केली.

पिंपरी-चिंचवड संविधान बचाव समितीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर या कायद्याच्या विरोधात आयोजित निषेध महा जनसभेत तो बोलत होता.  पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाच्या पाठीमागे आज (शुक्रवारी) झालेल्या निषेध महासभेला ऍड. अविक सहा, मानव कांबळे, मारुती भापकर, अखिल मुजावर, प्रताप गुरव, सुरेश बेरी,  माधव आव्हाड यांच्यासह  नागरिकांची मोठी गर्दी होती. तीनही कायदे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जेएनयू जिंदाबादचे नारे यावेळी देण्यात आले. तसेच न्यायालयाचा निकाल 22 जानेवारीला येणार आहे.  शहराच्या विविध भागात 22 तारखेपर्यंत शांततेत आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

उमर पुढे म्हणाला, देशाचा विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गरिबी यावरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशात हिंसा पसरविली जात आहे. संसदेत भाजपचे बहूमत आहे. त्याचा त्यांना अहंकार आहे. परंतु, जनता रस्त्यावर बहूमत सिद्ध करेल. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. कोणतीही अहिंसा होऊ दिली जाणार नाही. भविष्य वाचविण्यासाठी लढाई लढत आहोत. महाराष्ट्र पोलिसांचे आभार मानतो. पोलिसांकडून आम्हाला सहकार्य मिळत आहे.

रोहित वेमुलाची आत्महत्या नव्हती. त्याचा खून केला होता.  त्याचे विचार मारले नाहीत. रोहित आमच्यामध्ये जिवंत आहे.  मै शेर नही हू इन्सान हू और इन्सान सोचता समझता है, गुजरात का शेर ना सोचता है ना समझता है, असेही तो म्हणाला.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि एनपीआर या कायद्यांमुळे  विविध नागरिकांमध्ये नाराजी आहे. नागरिकांना आपले भारतीयत्व सिद्ध करावे  लागणार आहे. सरकारने हे कायदे मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, पिंपरीतील मेळाव्या दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तासाठी तैनात ठेवले होते. वरिष्ठ अधिकारी देखील हजर होते. पिंपरीतून नेहरुनगरच्या दिशेने जाणारा रस्ता देखील बंद ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.