Pune : त्यागातून निर्मिलेली लोकशाही प्राणपणाने जपली पाहिजे- निरंजन टकले

मतदार जागृती परिषद' तर्फे आयोजित सभेला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज- ‘कल्चर ते अॅग्रीकल्चर ‘ सगळीकडे मोदी सरकारने विध्वंस करुन ठेवला आहे. समाजाला लुळापांगळे करुन राज्य करायचे कारस्थान संघ परिवाराने रचले आहे. अशा परिस्थितीत देशाची अत्यंत कष्टातून, त्यागातून निर्मिलेली लोकशाही प्राणपणाने जपली पाहिजे, असे प्रतिपादन पत्रकार निरंजन टकले यांनी केले. राजकीय पक्षांचे महागठबंधन होवो, न होवो, मतदारांचे महागठबंधन झाले पाहिजे. भाजप विरोधांतील सशक्त उमेदवारालाच मतदान जाईल, असे काम आपण केले पाहिजे, असेही ते म्हणाले. ‘मतदार जागृती परिषद’ या मंचातर्फे गुरुवारी (दि. 7) ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या यामध्ये निरंजन टकले,डॉ . अभिजित वैद्य, श्रीरंजन आवटे, प्रशांत कोठडीया , जांबुवंत मनोहर, सर्फराज अहमद, हे वक्ते सहभागी झाले. डॉ.कुमार सप्तर्षी लिखित ‘ लोकशाही’ या पुस्तिकेचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.

निरंजन टकले म्हणाले,” मोदी जर ‘ हिटलर ‘ बनण्याच्या टाईमलाईनवर असतील, तरी भारताने जर्मनी बनण्याच्या टाईमलाईनवर राहू नये. आपल्या पुढच्या पिढयांना भयमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी आपल्यालाच लढा द्यावा लागणार आहे. पोलिटिकल मोटिव्ह ‘ जर लोया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाला दिसले, तर सुब्रम्हण्यम यांचा ‘ नॅशनल हेरल्ड ‘ प्रकरणी काय मोटिव्ह होता ? सावरकर , गोहत्या या दोन शोध पत्रकारिता स्टोरीजनंतर न्या.लोया यांच्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणावर प्रकाश टाकणारी स्टोरी मी केली. या प्रकरणी न्यायालय, माध्यमे कसा प्रतिसाद देतात, हे आपण पाहिले आहे.
सयद शूजा प्रकरणी त्याने सांगितलेल्या माहितीवरून अधिक शोध घेणे हे माध्यमांचे काम असताना त्यालाच प्रश्न विचारले जात आहेत. वामन मेश्राम, एकनाथ खडसे यांनीही २०१४च्या निवडणूक प्रक्रियेबद्दल मतमतांतरे व्यक्त केली, मग त्यांना कोणी अधिक माहिती विचारत नाही ? शूजा हा कारस्थानाचा बळी आहे, त्याला प्रश्न विचारायचे का ज्यांच्यावर आरोप झालेत, त्यांना प्रश्न विचारायचे ?अनेकांनी शंका व्यक्त करुनही निवडणूक आयोगही झटकन ईव्हीएम बाबत आपला निर्धार लगेच जाहीर कसा करते? असे सवालही टकले यांनी उपस्थित केले.

मोदी सरकार हे राष्ट्रीय संकट आहे, ते परतवून लावले पाहिजे, मतदार जागृतीचे काम मतदान होईपर्यंत करावे असे आवाहन डॉ.कुमार सप्तर्षी यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. जर्मनीचा विध्वंस वेडाचारामुळे झाला, तसा भारताचा विध्वंस वेडाचारामुळे होऊ नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.

‘प्रा.सुभाष वारे म्हणाले, ‘ मतदान केल्यावरही नागरिकांनी लोकशाही टिकविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. ही राजवट संविधान विरोधी आहे.जनता रोज प्रतिक्रिया देत नाही, ती मतदानाद्वारे व्यक्त होते. त्यांना व्यक्त होण्याच्या भूमिकेपर्यंत आपण घेऊन गेले पाहिजे.

डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, ‘ भारताच्या खेडयातील माणूस धर्मनिरपेक्ष आहे. तसेच,राहुल पंतप्रधान होणार असतील तर त्यांना फुले -शाहू – आंबेडकर यांच्याशी ओळख करून देण्याची गरज आहे. ‘गुजरात फाईल्स् ‘ आणि ‘आय एम ए ट्रोल ‘ या दोन पुस्तकांचा आपण हत्यारासारखा वापर केला पाहिजे. काँग्रेसला विरोध करता करता आपण भाजपला पायघड्या घालता कामा नये. हा संपूर्ण परिवारच परत सत्तेवर येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान की मनुस्मृती, लोकशाही की हुकूमशाही असा हा संघर्ष आहे. तटस्थ असणे सोडून आता ठाम भूमिका घेण्याची गरज आहे.

सर्फराज अहमद म्हणाले, ‘ आताचा संघर्ष हा मानवी प्रवृत्ती विरुद्ध सैतानी प्रवृत्ती असा आहे. गंगा -जमनी संस्कृती संपवायला सत्ताधारी निघाले आहेत. ‘ मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट ‘ योजनेच्या नावाखाली अनेक ग्रंथागारांतील दुर्मीळ ग्रंथसंपदा गायब केली जात आहे. राष्ट्रासाठी संघर्ष करण्याची वेळ होते, तेव्हा हे तथाकथित राष्ट्रवादी काय करीत होते ?’

प्रशांत कोठडिया म्हणाले, ‘जनतेला सतत भावनेच्या आहारी ठेवले आहे. धर्मद्वेष, धर्म प्रेम, खोटे राष्ट्र प्रेम अशा अनेक घटकांना एकत्रित लस सत्ताधाऱ्यांनी तयार केली आहे.सत्य पुढे येऊ द्यायचे नाही, हा या सरकारचा निर्धार आहे. खोटी आकडेवारी देण्यात हे सरकार पटाईत आहे. सांख्यिकी विभागाचे आकडेही बदलण्यात येत आहेत. अत्यंत खालच्या थराला जाणारा हा पंतप्रधान मिळणं ही लाजीरवाणी गोष्ट ठरली आहे. दलित, मुस्लिम मतदारांची नावे वगळण्याचे पध्दतशीर कारस्थान सुरू आहे. म्हणून जागरूक राहण्याची गरज आहे. ‘

जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘ नरेंद्र मोदी हे संविधानाच्या शपथेशी प्रामाणिक राहिले नाहीत. जनतेत जी उदासीनता आहे, ती झटकण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

सूत्रसंचालन संदीप बर्वे यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन संदीप बर्वे, जांबुवंत मनोहर, मयुरी शिंदे, त्रिवेणी मार्डीकर, सचिन पांडुळे, अजय मेमाणे, रोहिणी पवार, दुर्गा शुक्रे, इस्माईल शेख यांनी केले. राजकीय पक्षांबाहेरील परिघांमध्ये ‘मतदार जागृती परिषद’ कार्यरत असून पुण्यात आणि राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. पहिली सभा २० जानेवारी रोजी एस एम जोशी फाउंडेशन येथे झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.