Talegaon News : अत्याधुनिक 122 व्यापारी गाळ्यापैकी 79 व्यापारी गाळे धूळखात

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने उत्पन्नवाढीसाठी बांधलेल्या अत्याधुनिक 122 व्यापारी गाळ्यापैकी 79 व्यापारी गाळे धूळखात पडून आहेत. मागील वर्षाचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेळोवेळी करण्यात येणारे लॉकडाऊन यामुळे कोणीही हे गाळे घ्यायला धजत नाही. त्यामुळे भाड्यातून उत्पन्नवाढीचा नगरपरिषदेचा कयास सध्यातरी स्वप्नच ठरत आहे.

तळेगाव नगर परिषदेने मारुती मंदिर चौकात श्रीमंत सरदार अजितसिंहराजे दाभाडे सरकार व्यापारी संकुल व जिजामाता चौकात कै. केशवराव वाडेकर व्यापारी संकुल अशा अत्याधुनिक सर्व सोयींनीयुक्त इमारती बांधल्या आहेत. मात्र त्यामध्ये असलेल्या गाळ्यांचे भाडे व अनामत रक्कम मोठी ठेवल्याने हे व्यापारी गाळे गेली दोन वर्ष पडून आहेत.

मारुती मंदिर चौकातील व्यापारी गाळ्यांच्या 3 भव्य इमारती आहेत. त्यामध्ये एकूण 78 व्यापारी गाळे आहेत.तसेच जिजामाता चौकातील इमारतीमध्ये 44 गाळे आहेत.या गाळ्यांचा आत्तापर्यंत नगरपरिषदेने सहा वेळा ऑनलाईन लिलाव केला. मात्र त्यास भाडे आणि मोठे डिपॉझिटमुळे यामुळे व्यवसायिकांकडून अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला.

या गाळ्यांसाठी सध्या आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या रकमेचा आणि अनामत रकमेचा पुनर्विचार करावा, अशी मागणी अनेक व्यावसायिक करत आहेत. मात्र प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याने हे गाळे तसेच पडून आहेत.कोरोना आणि लॉकडाऊन मुळे कोणी गाळे घ्यायला पुढे येत नसल्याने नगरपालिका प्रशासनाने शासनाकडे भाडे व अनामत रकमेबाबत बाबत विचार करावा अशी मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.