Pimpri News : महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेला ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ जाहीर

27 मे रोजी पुणे येथे होणार पुरस्काराचे वितरण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या महाराष्ट्रातील आद्यसंस्थेतर्फे 116 व्या वर्धापन दिनी देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी यांनी नुकतीच केली. त्यामध्ये मसाप पिंपरी चिंचवड शाखेला राजा फडणीस पुरस्कृत ‘उत्कृष्ट शाखा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सन्मान चिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. शुक्रवारी (दि. 27 मे) एस. एम. जोशी सभागृह गांजवे चौक पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

मसाप पिंपरी चिंचवड शाखेने कोरोनाच्या काळात सर्वाधिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्याचा जागर केला आणि साहित्य ज्योत तेवत ठेवली. तसेच या खडतर काळात निराशेचा सूर असताना विशेष उपक्रम राबवून सहित्यिकांचा उत्साह कायम ठेवण्यात यश मिळवले. त्याचप्रमाणे या काळात मुख्यमंत्री कोरोना निधी मध्ये 31 हजार रुपयांची देणगी देणारी पिंपरी चिंचवड शाखा ही महाराष्ट्रात साहित्य क्षेत्रातील एकमेव शाखा होती.

उत्तमोत्तम साहित्य उपक्रमाचे आयोजन करणे, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, साहित्यिकांची आरोग्य तपासणी करणे ही या शाखेची वैशिष्टे आहेत. सध्या या शाखेतर्फे शान्ता शेळके जन्मशताब्दी निमित्त ‘शांताबाईंना मानवंदना’ अशा अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे. हा उपक्रम वर्षभर चालणार असून त्यामध्ये साहित्य, नाट्य, संगीत सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग आहे.

पिंपरी चिंचवड शाखेची सातत्यता अभिनवता, परिश्रम याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड झाल्याने शाखेचा यथोचित गौरव झाल्याची भावना सदस्य, सभासद व साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. हा पुरस्काराचा सोहळा 27 मे रोजी एस. एम. जोशी सभागृह गांजवे चौक पुणे येथे होणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितिन करमळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.