Chinchwad News : ऑक्सिजन संपत आला असून रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता

 खासगी रुग्णालयांकडून बंदोबस्तासाठी पोलिसांशी संपर्क

एमपीसी न्यूज – खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील परिस्थिती गंभीर झाली आहे. रुग्णांवर उपचार करणे डॉक्टर आणि रुग्णालयांसाठी अडचणीचे झाले आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत खासगी रुग्णालयांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. पोलीस देखील खासगी रुग्णालयांच्या संपर्कात असून योग्य त्या ठिकाणी बंदोबस्त लावला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची गरज असलेले सुमारे एक हजार 200 पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र या रुग्णालयांकडील ऑक्सीजनचा साठा मंगळवारी (दि. 20) रात्रीनंतर केव्हाही संपू शकतो. ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी खासगी रुग्णालयांनी प्रयत्न केले. मात्र ऑक्सिजन उपलब्ध झाला नाही. त्यामुळे रुग्णालयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच नवीन रुग्ण दाखल करून घेण्यातही रुग्णालयांना अडचणी येत आहेत.

महापालिका रुग्णालय, जम्बो कोविड सेंटर व ऑटॉक्लस्टर येथील कोविड सेंटर येथेही बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयातील रुग्णांना कुठे हलवावे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांनी रोष व्यक्त केल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून खासगी रुग्णालयांकडून पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

ऑक्सिजनचा साठा संपत आला असून तो उपलब्ध होण्याबाबत ‘एफडीए’ अधिकाऱ्यांना विनंती केली. मात्र अद्याप ऑक्सिजन उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे नवीन रुग्ण दाखल करुन घेता येत नाहीत. आहेत या रुग्णांना ऑक्सीजन कोठून आणावा, असा प्रश्न आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

– डॉ. प्रमोद कुबडे, सचिव, पिंपरी -चिंचवड हॉस्पिटल ओनर असोसिएशन

मंगळवारी दुपारपासून सर्व हॉस्पिटलला भेटी देऊन पोलीस माहिती घेत आहेत. रात्र पाळीतील अधिकाऱ्यांनाही हॉस्पिटलला भेटी देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल. पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत.

– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी -चिंचवड

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.