Padmashree Award News : सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री’ जाहीर

एमपीसीन्यूज : ‘अनाथांच्या माय’ अशी ओळख असलेल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ आणि चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताब जाहीर करण्यात आला आहे. प्रभुणे यांच्या रूपाने पिंपरी चिंचवड शहरासाठी दुसऱ्यांदा हा सन्मान जाहीर झाल्याने पिंपरी चिंचवडकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.

सिंधुताई सपकाळ यांनी पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे राज्यासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

गिरीश प्रभुणे यांचे भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या विशेषतः पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. सोलापूर जिल्ह्यात यमगरवाडी येथे पारधी समाजासाठी यमगरवाडी सेवा प्रकल्प उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सचिव व अध्यक्ष म्हणून त्यांनी समर्थपणे धुरा पेलली आहे. क्रांतिवीर चापेकर स्मारकाबरोबरच समाजातील वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शैक्षणिक प्रकल्पाच्या उभारणीत त्यांचे योगदान खूप मोठे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सामाजिक समरसता मंच अशा विविध माध्यमातून त्यांनी कामाचा ठसा उमटविला. सामाजिक समरसतेचा विचार रुजविण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. सामाजिक समरसता साहित्य संमेलनाच्या आयोजनातही त्यांची महत्त्वाची भूमिका असते.

गिरीश प्रभुणे हे पत्रकार, लेखक, कवी तसेच चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. राज्य व देश पातळीवरील पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.