Chikhali Crime News : मजुरीचे पैसे न दिल्याने पेंटरने केला खून; आरोपीला छत्तीसगड मधून अटक

एमपीसी न्यूज – नेवाळे वस्ती चिखली येथे झालेल्या खुनाच्या गुन्ह्याची चिखली पोलिसांनी उकल केली आहे. पेंटिंगचे काम करणाऱ्या मजुराने त्याच्या कामाचे पैसे न दिल्याने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिनेश संतोष साहू (वय 19, रा. अवसपारा गुनियारी, ता. तकतपुर, जि. बिलासपूर, छत्तीसगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, वीरेंद्र वसंत उमरगी (वय 42, रा. गणेश सिद्धी पार्क, नेवाळे वस्ती, चिखली. मूळ रा. विजापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र उमरगी ‘ओम लॉजीस्टिक’ कंपनीत काम करत होते. तिथून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांना ग्रॅच्युटीचे पैसे मिळाले होते. वीरेंद्र यांचे पत्नीशी भांडण झाले होते, त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ते विभक्त राहत होते.

वीरेंद्र यांना दारूचे व्यसन होते. दारू पिणारे मित्र त्यांच्याकडे ये जा करत असत. दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. दरम्यान त्यांच्या मित्राने फोन केला पण वीरेंद्र यांनी उचलला नाही. मित्राने येऊन बघितले असता त्यांचा मृतदेहच आढळला.

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी उमरगी यांच्या इमारतीमध्ये पेंटिंगच्या कामासाठी आलेल्या कामगारांची चौकशी केली. त्यात एका कामगाराचा फोन गुन्हा घडल्यानंतर बंद लागत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी थेट छत्तीसगड येथे धाव घेऊन दिनेश साहू याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या एका मित्रासोबत मिळून हा खून केल्याचे सांगितले.

दिनेश साहू हा छत्तीसगड येथून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होता. दरम्यान पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. दिनेश हा मयत उमरगी यांच्याकडे पेंटिंगचे काम करत होता. उमरगी यांनी त्याला त्याच्या कामाचे पैसे न दिल्याने त्याने हा गुन्हा केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विवेक कुमटकर, सहाय्यक पोलीस फौजदार आनंद चव्हाण, पोलीस अंमलदार सुनिल शिंदे, चेतन सावत, बाबा गर्जे, विश्वास नाणेकर, चंद्रशेखर चोरघे, विपुल होले, गणेश टिळेकर, कबीर पिंजारी, नुतन कोडे, संतोष सपकाळ यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.