एमपीसी न्यूज – पेंटिंगचे काम करत असताना झुल्याचा दोर तुटल्याने पेंटर झुल्यावरून खाली पडला. त्यात पेंटरचा मृत्यू झाला. ही घटना 14 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता सेक्टर 26, निगडी प्राधिकरण येथे घडली.
व्यंकटेश विरंन्ना सरलू (वय 49) असे मृत्यू झालेल्या पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक काळू बोकड यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर बसवराज नेरट याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर याने निगडी प्राधिकरण येथील सिद्धिविनायक प्रस्थ गंगा ए सोसायटीचे पेंटिंगचे काम घेतले होते. त्या सोसायटीमध्ये मयत व्यंकटेश सरलू हा कामगार पेंटिंगचे काम करत होता. सोसायटीच्या बाहेरील बाजूच्या भिंतीचे पेंट करण्यासाठी व्यंकटेश झुल्यावर काम करत होता.
झुल्याची दोरी तुटून व्यंकटेश खाली पडला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आरोपी शंकर याने कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केली नाही, त्यामुळे व्यंकटेशचा मृत्यू झाला. व्यंकटेशच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.