Pune Crime News : सायबर चोरट्यांनी पुण्यातील चित्रकाराला ‘असे’ फसवले

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून लोकांना गंडवणाऱ्या सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका चित्रकाराची देखील फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. सुरुवातीला पुण्यातील एका चित्रकाराकडे संपर्क साधून चित्र काढून देण्याची मागणी केली. त्यानंतर चित्रापोटी देण्यात येणारा चेक कस्टममध्ये अडकल्याचे सांगून या सायबर चोरट्यांनी 80 हजार रुपयांना गंडा घातला. पुण्याच्या पर्वती परिसरात राहणाऱ्या एका 54 वर्षीय चित्रकाराने फिर्याद दिली असून त्यानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी हे चित्रकार आहेत. पुण्याच्या पर्वती पायथा परिसरात ते राहतात. काही दिवसांपूर्वी पायल पाठल नामक महिलेने त्यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधला. त्यांना एक फोटो दाखवून त्यावरून पेंटिंग काढायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी एक लाख 28 हजार रुपये मानधन देण्याचेही ठरले. दुसऱ्या दिवशी त्यांना संबंधित रकमेचा चेकचा फोटो देखील पाठवण्यात आला.

दरम्यान काही दिवसानंतर पुन्हा त्या चित्रकाराशी संपर्क साधत चेक कस्टम विभागात अडकला असून तो सोडवण्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीने वेळोवेळी 80 हजार रुपये भरले. दरम्यान इतके पैसे भरल्यानंतर आणखी पैशाची मागणी होत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे चित्रकाराच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. संबंधित अर्जावर प्राथमिक तपास झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.