T20 WC: पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला पाच गडी राखून केले पराभूत

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी) एक अत्यंत खतरनाक आणि यास्पर्धेत सुर गवसलेली पाकिस्तानी टीमने किविज संघावर सुद्धा पाच गडी राखून विजय मिळवून उपांत्य फेरीकडे लक्ष ठेवत आपले स्थान आणखीनच मजबूत केले आहे.

ग्रुप बीच्या आजच्या दुसऱ्या आणि एकूण अठराव्या सामन्यात पाकिस्तान कर्णधार बाबर आझमला नशिबाने आजही साथ देत नाणेफेकीचा अनुकूल कौल दिला आणि त्याने क्षणातच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय जाहीर केला.शारजाच्या मैदानावर प्रथम गोलंदाजी करण्याचा त्याचा निर्णय एकदम सार्थ ठरला आणि मजबूत म्हणवल्या जाणारी न्यूझीलंड संघाची फलंदाजी केवळ 134 च धावा करू शकली. भारताविरुद्ध शाहीन आफ्रिदीने जी कमाल केली होती आज तशीच कमाल हरिस रौफने केली.पाकिस्तान संघाला नेहमीच एकाहून एक जलदगती गोलंदाज लाभलेले आहेत, आजही त्याचीच प्रचिती रौफने दाखवत आपल्या चार षटकात केवळ 22 धावा देत चार किवी फलंदाजांची शिकार केली.

न्यूझीलंड संघाची सुरुवात सावध होती,पॉवरप्ले च्या शेवटच्या षटकात गुप्टील वैयक्तिक 17 आणि संघाच्या 36 धावा असताना रौफच्या चेंडूवर त्रिफळाबाद झाला.त्यानंतर केवळ 18 धावांची भर पडताच मिचेल आणि संघाची धावसंख्या 56 असताना निशाम सुद्धा बाद झाला,यानंतर म्हणावी तशी एकही भागीदारी न झाल्याने चार बाद नव्वद ते 20 व्या षटकानंतर 8 बाद 134 धावाच फलकावर लागू शकल्या.कर्णधार केन 25आणि कोंव्हेच्या 27 धावा सोडल्या तर इतर किवी फलंदाज काहीही योगदान देऊ शकले नाही.

135 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना बाबर आझम साऊदीच्या गोलंदाजीवर आज लवकर बाद झाला,त्याने केवळ 9च धावा केल्या.त्यानंतर 9 व्या षटकात फकर झमान सुद्धा वैयक्तिक अकरा धावा काढून बाद झाला,दुसऱ्या बाजूने रिझवान आजही चांगले खेळत होता,पण हाफिज बाद झाल्यावर लगेचच तो ही वैयक्तिक 33 धावांवर ईष सोधीच्या चेंडूवर पायचीत झाला, यावेळी पाकिस्तानची अवस्था चार बाद 69 होती.त्यानंतर थोड्याच वेळात इमाद वाशीम सुद्धा 11 धावा करून बोल्टच्या चेंडूवर पायचीत झाला, यावेळी पाकिस्तान 5 बाद 87 अशा अडचणीत होते,आणि किवी संघ विजयाजवळ,मात्र आसिफ अली आणि अनुभवी शोएब मलिकने परिस्थिती अचूक वाचत आक्रमक खेळ करत अवघड वाटणारा विजय नाबाद 48 धावांची अभेद्य भागीदारी करून सोपा केला,आणि लागोपाठ दुसरा विजय मिळवत अंकतालिकेत चार गुणासह पहिले स्थान ही पटकावले.

पाकिस्तान संघ नेहमीच इतर संघासाठी धोकादायक मानला जातो,त्यात या स्पर्धेत त्यांना जबरदस्त सुरुवात मिळाली असल्याने त्यांच्या उपांत्यफेरीचा मार्ग सोपा झालाय असे मानले जात आहे.तर भारतापाठोपाठ न्यूझीलंड संघालाही पराभव स्वीकारावा लागल्याने येत्या 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याला खूप मोल आलेले आहे.चार षटकात चार बळी मिळवून संघाला विजयी करणारा रौफ सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.