Pimpri News : ‘पालावरचं जगणं’ साहित्यविश्वातील अभूतपूर्व कविसंमेलन

एमपीसी न्यूज –  “सामूहिकपणे संघर्ष केल्याशिवाय भटक्या-विमुक्त जमातींची प्रगती होणार नाही. भारत देशात गरीब माणसे पालात नाहीत तर पक्क्या घरात राहिली पाहिजेत, यासाठी सरकारने नव्या योजना कार्यान्वित करणे जरुरीचे आहे!” असे विचार महाराष्ट्र कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी गुरुवारी (दि. 19 मे) रेल्वे स्टेशन परिसर, आकुर्डी प्राधिकरण येथील गरिबांच्या पालात व्यक्त केले. शब्दधन काव्यमंच आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पालावरचं जगणं’ या साहित्यविश्वातील पहिल्या आगळ्यावेगळ्या कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काशिनाथ नखाते बोलत होते.

शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक -अध्यक्ष सुरेश कंक यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “विंचवाप्रमाणे बिऱ्हाड पाठीवर घेऊन भटकंती करणाऱ्या भटक्या-विमुक्त जातीजमातींचे प्रश्न समजून घेण्यासाठी या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले!” अशी भूमिका मांडली.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी पालावरील व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जगण्याशी निगडित समस्यांचा ऊहापोह केला. पालावर ज्यांचे बालपण व्यतीत झाले असे कवी भरत दौंडकर यांच्या कवितेचे राजेंद्र वाघ यांनी अभिवाचन करून ‘पालावरचं जगणं’ या कविसंमेलनाचा प्रारंभ केला.

तानाजी एकोंडे, राधाबाई वाघमारे, अरुण कांबळे, नेहा चौधरी, हेमंत जोशी, फुलवती जगताप, सां.रा. वाठारकर, निशिकांत गुमास्ते, संगीता झिंजुरके, आत्माराम हारे, कैलास भैरट, शामला पंडित, मयूरेश देशपांडे, सुभाष चव्हाण, शिवाजीराव शिर्के, सविता इंगळे, चंद्रकांत जोगदंड, डॉ. पी.एस. आगरवाल, संगीता सलवाजी, नंदकुमार मुरडे, शोभा जोशी या कवींनी आपल्या वैविध्यपूर्ण कवितांमधून पालावरचे अनभिज्ञ जग शब्दांतून साकार केले.

यावेळी कवी अनिल दीक्षित यांच्या कवितेची ध्वनीफीत ऐकविण्यात आली. त्यानंतर पालावर धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. मुरलीधर दळवी, अशोक गोरे, अण्णा जोगदंड, आनंद मुळूक, जयश्री श्रीखंडे, शरद काणेकर, सुंदर मिसळे, नाना कसबे, चंद्रकांत कुंभार, ओमप्रकाश मोची यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश घोरपडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.