Palkhi Sohala : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील चोरलेले अडीज लाख किंमतीचे सोने पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायच्या गुन्हे शाखा विभागाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज (Palkhi Sohala) पालखी सोहळ्यादरम्यान 7 गुन्हे उघडकीस आणले व त्यातील 2.60 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालाय हद्दीमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्तांच्या गळ्यातील मंगळसूत्र/ चैन चोरी, पाकीट मारी तसेच महिला छेडछाड करणाऱ्या टोळ्या परजिल्ह्यातून देहूगाव येथे येत असतात.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास इंगवले, गुन्हे शाखा युनिट 5 व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, गुन्हे शाखा युनिट 2 यांचे मार्गदर्शनाखाली 1) भुरट्या चोरी विरोधी पथक, 2) मंगळसूत्र चोरी विरोधी पथक, 3) पाकीटमार चोरी विरोधी पथक, 4) महिला छेडछाड चोरी विरोधी पथक अशी दिवसपाळी व रात्रपाळीसाठी वेगळी पथके म्हणजेच एकूण 8 पथके नेमण्यात आली होती.

या पथकांनी कारवाई (Palkhi Sohala) करून गोपनीय माहिती काढून गर्दीच्या ठिकाणी आढळून आलेले एकूण 140 संशयित पुरुष व महिला यांना ताब्यात घेऊन त्यापैकी 75 व्यक्तींवर सीआरपीसी कलम 109 प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई केली. तसेच, जबरी चोरी करणारे 23 गुन्हेगारांना रंगेहात पकडून त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यापैकी 7 गुन्हे उघडकीस आणून त्यातील चोरीस गेलेले 2,60,096 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
तसेच, संशयित आरोपीपैकी आकाश उर्फ भैय्या पवार (वय 25) याच्यावर अकलूज पोलिस ठाण्यात भा. द. वि कलम 354, 363, 366, पोक्सो ऍक्ट, ऍट्रॉसिटी ऍक्ट कलम 11, 12  नुसार गुन्हे दाखल आहेत. त्याचा अभिलेख तपासला असता तो 2017 पासून कोर्टात हजर राहत नसल्याने जिल्हा व सत्र न्यायालय, माळशिरस न्यायालयाचे त्याच्या नावे निघालेले एन. बी. डब्लू वॉरंट अद्याप प्रलंबित आहे. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी अकलूज पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.