Panaji: गुड न्यूज! संपूर्ण राज्य कोरोनामुक्त करण्यात गोवा यशस्वी!

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू देशभर पसरत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आलीय. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा राज्याने कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.  गोव्यातील कोरोनाच्या सर्व रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले असून राज्यातील सर्व कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात गेल्या चौदा दिवसांत एकही नवीन रुग्ण न सापडल्याने गोवा ‘करोनामुक्त’ झाला आहे, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज (रविवारी) केली.

‘गोव्यातील शेवटच्या करोनाबाधित रुग्णचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे ही समाधानाची आणि सुटकेचा अनुभव देणारी गोष्ट आहे. डॉक्टर आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे यासाठी नक्कीच कौतुक करायला हवे. गोव्यात तीन एप्रिलनंतर कोणताही नवा करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही’, असे ट्वीट प्रमोद सावंत यांनी केले आहे.

गोव्यात 18 मार्चला दुबईहून परतलेली एक व्यक्ती करोना संक्रमित असल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले. तो गोव्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण ठरला. त्यानंतर तीन एप्रिलपर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या सातपर्यंत वाढली. त्यानंतर मात्र गोव्यात कोणताही नवीन रुग्ण आढळला नाही. 15 एप्रिलपर्यंत राज्यातील सहा करोनाबाधित रुग्णांवर उपचार यशस्वी ठरले व त्यांना घरी सोडण्यात आले. उरलेल्या शेवटच्या रुग्णाच्या दुसऱ्या चाचणीचा अहवालही आज निगेटीव्ह आल्याने गोव्यातील नागरिकांनी अखेर मोकळा श्वास घेतला.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याअगोदरच दक्षिण गोवा जिल्ह्याला ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. आता संपूर्ण गोवा राज्य कोरोनामुक्त जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आता संपूर्ण राज्यच ग्रीन झोन म्हणून घोषित करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.