Pimpri: पाणी पुरवठ्याच्या बैठकीत राडा, भाजप नगरसेवकाने फोडला माईक, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची ‘बघून घेण्याची भाषा’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत चांगलाच राडा झाला. प्रभागातील पाण्याची समस्या मांडत असताना अचानक महापौरांनी बैठक संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतापलेले भाजपचेच नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी हातातील माईक महापौरांसमोर फेकून दिला. त्यानंतर नखाते आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यात हमरीतुमरी झाली. एकमेकांना ‘बघून घेण्याची भाषा’ झाली. त्यामुळे विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न लांबच राहिला अन् वादामुळेच बैठक चर्चेत राहिली.

पाणीपुरवठ्यासह स्थापत्य, विद्युत, नागरवस्ती विकास योजना, पिंपरीतील भीमसृष्टीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज (मंगळवारी) अॅटो क्लस्टर येथे महापौर राहुल जाधव यांच्या अध्यतेखाली बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची डेडलाईन शनिवारपर्यंत दिली होती. परंतु, डेडलाईन संपली. तरीही शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. अनेक भागात पाणीपुरवठ्याची समस्या कायम आहे. पाणी वेळेवर येत नाही. पाण्याचे नियोजन कोलमडले आहे, अशा तक्रारींचा पाढा सर्वपक्षीय नगरसेवकांनी बैठकीत मांडला. महिला नगरसेविकांनी आक्रमक भुमिका घेतली.

भाजपचे रहाटणीचे नगरसेवक चंद्रकांत नखाते प्रभागातील पाण्याची समस्या मांडत होते. मध्येच महापौर राहुल जाधव यांनी सर्व नगरसेवक त्याच समस्या मांडत असल्याचे सांगत बैठक संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतापलेले नखाते यांनी हातातील माईक व्यासपीठासमोर फेकला.

त्यानंतर नखाते आणि पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांच्यात जुंपली. प्रकरण हमरीतुमरीवर आले. दोघांनीही एकमेकांना बघून घेण्याची भाषा केल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे पाणीपुरवठ्याची बैठक वेगळ्याच कारणाने गाजली.

याबाबत बोलताना नगरसेवक चंद्रकांत नखाते म्हणाले, ‘पाणीपुरवठ्याच्या बैठकीसाठी आम्हाला बोलवले होते. प्रभागातील पाणीपुरवठ्याची समस्या मांडू दिली नाही. त्यामुळे माईक फोडला. कार्यकारी अभियंता रामदास तांबे काम व्यवस्थित करत नाहीत. केवळ गोड बोलतात. जबाबदारीने काम करत नाहीत. सहा महिन्यांपुर्वी तापकीरनगर येथील नायडू टाकीवरुन पाणी देतो असे तांबे यांनी सांगितले होते. परंतु, केवळ पाईपलाईन टाकली आहे. आयुक्तांसमोर हे सांगण्याचा प्रयत्न केला असता तांबे यांनी मीच काम थांबवत होतो, असे सांगण्याचा प्रयत्न केले. नागरिकांना पाणी द्यायचे असताना मी कशाला काम थांबवेन. तांबे यांनी वेगळी भाषा वापरली. त्यामुळे मीही वाकडे-तिकडे बोललो’, असेही ते म्हणाले.

महापौर राहुल जाधव म्हणाले, ‘माईक फोडलेला मला माहित नाही. मी आतमध्ये होतो. शिष्टमंडळ भेटीला आल्याने आतमध्ये गेलो होतो. त्यामुळे माईक फोडल्याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.