Pimpri : क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास जतन करणारी पंढरी – शंकर तडाखे

एमपीसी न्यूज – क्रांतिकारकांच्या बलिदानाचा खर्‍या अर्थाने सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. लहुजी वस्ताद साळवे हे अनेक क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान व गुरु होते. क्रांतिकारकांचा जाज्वल्य इतिहास जतन करणारी पंढरी ठरावी, असे मत क्रांतिवीर लहुजी शक्तीसेना संघटनेचे संस्थापक  व अध्यक्ष शंकर तडाखे यांनी व्यक्त केले.

निमित्त होते क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित क्रांतिदिन व जगविख्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रम सोहळ्याचे. यावेळी उद्योजक अनिल सौंदाडे, सामाजिक कार्यकर्ते अविनाश कांबिकर, जालिंदर कांबळे, अजय साळुंखे, अॅड.कोमल साळुंखे, क्रांतिवीर चापेकर  स्मारक समितीच्या उपाध्यक्षा शकुंतला बन्सल,कार्यवाह अॅड.सतिश गोरडे, सहकार्यवाह रविंद्र नामदे, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शाळा समिती अध्यक्ष गतिराम भोईर,अशोक पारखी,नीता मोहिते, नितीन बारणे,सदस्य आसाराम कसबे आदी  उपस्थित होते.

 ते म्हणाले, चापेकर बंधू सुद्धा त्यांचेच शिष्य आहेत.लहुजी वस्ताद व वासुदेव बळवंत फडके यांचा पुतळा प्रथम उभारणारे पिंपरी चिंचवड शहर आहे.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेला अनमोल साहित्याचा साठा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अॅड.अनंत शेंडगे यांनी फक्त दीड दिवसाच्या शाळेत शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य संपदेवर आज अनेकजण पी.एच.डी.करत आहेत असे गौरवपूर्ण उद्गार काढले.

या कार्यक्रमात क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष व पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे संस्थापक गिरीश प्रभुणे म्हणाले, सामाजिक मुक्ततेकडे वाटचाल करणारी ,समरसता साधणारी क्रांती घडली पाहिजे.यासाठी शिक्षणविभागाने पुढाकार घ्यायला हवा. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. सुमित्रा सोन्ने यांनी गायलेल्या जोशपूर्ण क्रांतिगीताने कार्यक्रमाची वातावरण निर्मिती झाली. यावेळी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या प्रधानाचार्या पुनम गुजर व  समितीच्या शाळेतील मुख्याध्यापक वासंती तिकोने, जगन्नाथ देविकर, नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर यांचा सन्मान करण्यात आला.

समितीचे सदस्य आसाराम कसबे यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना हे दोन्ही कार्यक्रम एकत्रितपणे घेण्याचा उद्देश व त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली. यावेळी माजी परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता जोशी यांनी केले. तर समितीचे शाला समिती अध्यक्ष गतिराम भोईर यांनी आभार मानले. समिती सदस्य आसाराम कसबे यांनी गायलेल्या लहुवंदनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभदा साठे व अतुल आडे यांचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.