Pandharpur Election News : ‘पंढरपूर’च्या मतदारांना राज्याच्या सर्व भागातून मतदानासाठी येण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – पंढरपूर मतदारसंघातील मतदार नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी राज्याच्या विविध भागात तसेच राज्याबाहेर राहत आहेत. त्यांना पंढरपूर पोटनिवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी राज्याच्या सर्व भागातून पंढरपूरला येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यासाठी मतदार यादीत स्वतःचे नाव असल्याचा कोणताही पुरावा सोबत बाळगणे आवश्यक असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी सांगितले.

अवर सचिव घोलप यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की, पंढरपूर मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान 17 एप्रिल 2021 रोजी होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

राज्यात सध्या घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या राज्याच्या इतर भागात किंवा राज्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना मतदानासाठी प्रवास करून मतदारसंघात येऊ द्यावे, अशा सूचना राज्य शासनाने प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

13 एप्रिल 2021 च्या सरकारी आदेशानुसार 16 एप्रिल 2021 च्या संध्याकाळी सहापासून ते 18 एप्रिल 2021च्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कोणत्याही वाहनाने वैध ओळखपत्रधारक किंवा मतदारयादीत स्वतःचे नाव असल्याचा कोणताही पुरावा घेऊन प्रवास करणाऱ्यास प्रवास वैध समजून परवानगी द्यावी.

‘ब्रेक द चेन’ शीर्षासह 13 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या आदेशांमध्ये निर्देशित केलेल्या बंधनात राहून असा प्रवास करण्यास संबंधित मतदारांना परवानगी द्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी प्रसिद्धीस पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.