Pandharpur News: पंढरपूर येथे कुंभार घाटाची 20 फुटी भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले बांधकाम ठेकेदाराच्या चौकशीचे आदेश

एमपीसी न्यूज – श्रीक्षेत्र पंढरपूर येथे काल रात्रीपासून संततधार पावसाचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. आज (बुधवारी) दुपारी दीडच्या सुमारास चंद्रभागेच्या काठावर असलेल्या कुंभार घाटाची सुमारे 20 फूट उंचीची भिंत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये गोपळ अभंगराव, राधा अभंगराव, मंगेश अभंगराव, पिलू जगताप, इतर अनोळखी व्यक्तीचा समावेश असून त्यात दोन यवतमाळ भागातील वारकरी महिलांचे मृतदेह असल्याचे समजते. कुंभार घाटाजवळील या नवीन घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या टाकल्या होत्या. त्या ठिकाणी ते फुल विक्री, प्रसाद विक्री, नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते.

कुंभार घाट येथील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना शासनाकडून मदत देणार याशिवाय या बांधकामातील ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून दोषी असेल तर कारवाई करणार असल्याची घोषणा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

कुंभार घाटाचे नवीन बांधकाम कोसळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दल व आपत्कालीन मदत यंत्रणेने सर्व सहा मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले आहेत. भिंतीचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका तेथील कोळी समाजाने घेतल्याने तणाव निर्माण आहे.

पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या तिरावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. कुंभार घाट येथील भिंत तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये आत्तापर्यंत सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत.

कुंभार घाटाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत माजी नगरसेवक रमेश कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी उपोषण करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. या ठेकेदारावर गुन्हा दाखल न केल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कोळी समाजाने घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.