Pune : ‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ कथकसम्राट पंडित बिरजू महाराज यांना जाहीर   

एमपीसी  न्यूज –  पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांना जाहीर झाला आहे. अशी  माहिती आदित्य प्रतिष्ठानच्यावतीने आदित्यव्रती श्रीकांत आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात  शुक्रवारी (दि. १८ मे)  येथे सायंकाळी  पाच वाजता  पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.

आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुदेव शंकर अभ्यंकर हे पं. बिरजू महाराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,  यावेळी आदित्यव्रती अमित तुळजापूरकर उपस्थित होते. सन्मानपत्र, सरस्वती चिन्ह, एक लाख रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण सोहळ्यादरम्यान कथकसम्राट पंडित बिरजू महाराज हे भावमुद्रा प्रकट करणार आहेत. तर पुरस्कार समारंभानंतर ‘कथक नृत्यसंध्या’ हा विशेष कार्यक्रम पंडित मनीषा साठे व त्यांच्या शिष्या आणि शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथकच्या विद्यार्थिनी सादर करणार आहेत.

भारतीय संतांचे विचार आणि अध्यात्म समाजापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचवण्याचे महत्त्वाचे आणि सात्विक कार्य “आदित्य प्रतिष्ठान” ही पुण्यातील नामांकित संस्था गेली ३५ वर्षे करीत आहे. ‘आदित्य प्रतिष्ठान’तर्फे लोणावळ्याजवळ तेहतीस एकर जागेत जगातील पहिले संत विद्यापीठ साकारले जात आहे. देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे येथे जतन केले जाणार आहे. आदित्य प्रतिष्ठानचा यंदा ३६ वा वर्धापनदिन आहे. संस्कृतीची अष्टांगे (धर्मकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, कला, विज्ञान आणि वाड्गमय) ज्या व्यक्ती आपल्या प्रचंड कार्याने समृद्ध करतात, त्यांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे “लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.