Chinchwad News : युवा गायिका नंदिनी गायकवाड यांना पंडित रतिलाल भावसार पुरस्कार 

एमपीसी न्यूज – ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प गायिका नंदिनी गायकवाड यांना पंडित रतिलाल भावसार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीधरनगर, चिंचवड येथे गुरुवारी (दि.21) हा पुरस्कार सोहळा पार पडला. 

या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधू जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी नादब्रह्म संस्थेचे प्रमुख डॉ. रवींद्र घांगुर्डे, ज्येष्ठ गायिका डॉ. वंदना घांगुर्डे, कार्यवाह अरुण चितळे, नंदिनीचे गुरू पंडित अंगद गायकवाड, अंजली गायकवाड, भावसार परिवारातील पद्मा भावसार, राजू भावसार उपस्थित होते

यावेळी बोलताना श्रीकांत चौगुले म्हणाले, ‘अभिजात संगीत हे भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. शेकडो वर्षांचा कलेचा वारसा गुरू परंपरेने जतन केला आहे.’ मधू जोशी म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड या औद्योगिकनगरीला सांस्कृतिक चेहरा प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यामध्ये घांगुर्डे दांपत्याचे योगदान खूप मोठे आहे. सध्याच्या बदलत्या परिस्थितीत हा समृद्ध वारसा तरुण पिढीने जोपासला पाहिजे.’

पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत मैफलीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे ध्वनीसंयोजन दर्शन कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन अनुश्री पानसे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.