Talegaon : पंडित संजीव अभ्यंकर यांना गानसरस्वती पुरस्कार

एमपीसी न्यूज – मेवाती घराण्याचे प्रख्यात तरुण गायक पंडित संजीव अभ्यंकर यांना 2018 या वर्षीचा गानसरस्वती पुरस्कार जाहीर झाला आहे. गानसरस्वती कै. किशोरी आमोणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे आद्य शिष्य डॉ. अरुण द्रविड यांनी हा पुरस्कार मागील वर्षापासून सुरु केला आहे.

दरवर्षी भारतीय शास्त्रीय कंठसंगीत क्षेत्रात प्रथितयश मिळवलेल्या 50 वर्षाखाली कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2017 साली पहिला गानसरस्वती पुरस्कार प्रख्यात गायिका मंजिरी असनारे यांना देण्यात आला. पंडित अभ्यंकर हे आद्य पिढीचे प्रख्यात गायक पद्मविभूषण पंडित जसराज यांचे शिष्य आहेत.

त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वर्षे कार्यक्रम गाजवले आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. गायकच नव्हे तर संगीतकार म्हणूनही त्यांनी नाव कमावलेले आहे. प्रसिद्ध गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांच्याबरोबर त्यांनी ‘जसरंगी’ नामक जुगलबंदीचा अभिनव कार्यक्रम अनेक ठिकाणी यशस्वी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.