Panvel: मावळचा मावळा बारामतीचे पार्सल परत बारामतीला पाठवणार -देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – ज्या उमेदवाराचे मतदान मावळ लोकसभा मतदार संघात नाही, असा उमेदवार मावळच्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामतीहून पाठवलेले हे पार्सल मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळा परत बारामतीला पाठवणार आहे; असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच मावळची जनता मतदान श्रीरंग बारणे यांना करेल, पण त्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना ताकद मिळेल. ही निवडणूक भारताच्या अस्मितेची, राष्ट्रीय सुरक्षेची, विकासाची निवडणूक आहे, असेही फडणवीस म्हणाले.

भाजपा, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल मधील कामोठे येथे जाहीर सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, खासदार श्रीरंग बारणे, महापौर डॉ. कविता चौटमल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, संपर्क प्रमुख दत्ता दळवी, जगदीश गायकवाड, उपमहापौर विक्रांत पाटील, बबनदादा पाटील, अरुण भगत, दिलीप पाटील, सुशील शर्मा, महेश बालदी आदी उपस्थित होते.

  • “माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मीच ओपनिंग करणार, असे शरद पवार म्हणाले होते. संपूर्ण तयारी करून ते लोकसभेच्या मैदानात उतरले. पण नरेंद्र मोदी यांनी गुगली टाकतात त्यांनी मैदानातून माघार घेत आपण बारावा खेळाडू असल्याचे जाहीर केले. जिथे स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारे शरद पवार यांचे काही चालले नाही; तिथे इतरांचे काय काम” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घरे, गॅस, वीज, आरोग्य, विमा, लघु उद्योगास चालना, शेतकऱ्यांना मदत अशा सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केले आहे. यातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल झाला आहे. त्याचबरोबर विरोधी राष्ट्रांना जशास तसे उत्तर देण्याची धमक केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आहे. हा नवीन भारत आहे. हा ऐकणारा भारत नाही, तर ठोकणारा भारत आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले.

  • रामदास आठवले म्हणाले, “महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः त्यांच्यासोबत आहोत. असा कसलेला पैलवान महायुतीकडून मावळच्या रणांगणात उतरवला आहे. समोरच्या उमेदवाराचा महायुतीपुढे निभाव लागणार नाही. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा विजय निश्चित आहे. नरेंद्र मोदी पूर्ण भारताला एकत्र आणत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा उमेदवार लोकसभेत जायला हवा.

रामदास आठवले यांनी त्यांच्या कवितेच्या खास शैलीत शरद पवार यांना पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल टोला दिला. आठवले म्हणाले, ‘शरद पवारांचा निर्णय झाला व्‍यर्थ, का पाठवला त्यांनी पार्थ’. राजकारण करत असताना राजकारणाचा त्याचबरोबर समाजकारणाचा अनुभव असणं महत्त्वाचं आहे. समाजाशी आपली बांधिलकी असणे गरजेचे आहे. अगदी नवख्या उमेदवाराला देशाच्या लोकसभेत पाठवणं संयुक्तिक नाही, असेही आठवले म्हणाले.

  • महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, “मागील पाच वर्षांपासून मावळ लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या संसदेत नेतृत्व करत असताना सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केले. अनेक योजना आणि प्रकल्प या भूमीत राबवले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून आलेला पैसा आणि उर्मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेल्या मतदानाच्या पवित्र अधिकाराला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण हा मावळचा मावळा हे खपवून घेणार नाही. शहरी आणि ग्रामीण भागात सातत्याने काम केले आहे. निवडणूक होईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेकजण मावळ मतदारसंघात येतील पण त्यानंतर कोणीही येणार नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा.”

माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. यासाठी संपूर्ण भारत देश एकवटला आहे. मोदी सरकारच्या कामाचा ठसा सर्व जनतेमध्ये उमटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी का दिली, हे अजून समजलं नाही. त्यांची जागा मावळ मतदारसंघात नाही, त्यांना इथली जनता त्यांना पुन्हा पाठवणार आहे. महायुतीचाच विजय होणार आहे.”

  • महापौर डॉ. कविता चौटमल म्हणाल्या, “नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व क्षेत्रात उत्तम काम केले आहे. तेच सरकार पुन्हा एकदा निवडण्याची जबाबदारी जनतेवर आली आहे. महिलांसाठी उज्वला गॅस योजना, बेटी बचाओ, बेटी पाढाओ योजनेसाठी भाग्यश्री योजना, मुद्रा योजना अशा अनेक योजना केंद्र सरकारने राबवल्या आहेत. सर्वकल्याणकारी सरकार पुन्हा येण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावे.”

बाळासाहेब पाटील म्हणाले, “महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित आहे. आता केवळ मताधिक्य किती मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे. ज्या उमेदवाराचे स्वतःचे मत देखील या मतदारसंघात नाही, असा उमेदवार महायुतीच्या विरोधात आहे. नवीन, तरुण उमेदवार राजकीय क्षेत्रात पदार्पण करतोय यासाठी आमचा अजिबात विरोध नाही. पण मतदारसंघाचा अभ्यास आणि सामाजिक बांधिलकी किती हाच सर्वात मोठा प्रश्न मावळच्या जनतेसमोर आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार केवळ पोरखेळ आणि स्टंटबाजी करत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या रायगड जिल्ह्यातील भागातील लढाई राष्ट्रवादी पक्षाने शेतकरी कामगार पक्षाच्या जीवावर उभी केली आहे. पण आता शेतकरी कामगार पक्षाला देखील या भागात आपले अस्तित्व शोधावे लागत आहे. अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादी पक्षाने जिंकण्याचे स्वप्न पाहू नये. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हेच निवडून येणार आहेत. पाच वर्षांच्या काळात नरेंद्र मोदी यांनी एकही सुट्टी घेतली नाही. सदासर्वकाळ त्यांनी आपले जीवन भारतीयांसाठी वाहिले. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्वांनी तत्पर राहायला हवे.”

  • जगदीश गायकवाड म्हणाले, “पनवेल शहराला पाणीपुरवठा कमी होत आहे. त्यासाठी पूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार आहे. कोंढाणा धरणाच्या घोटाळ्यामुळे ही परिस्थिती शहरात उद्भवली आहे. त्यामुळे शिस्त, वचन, सेवा जोपासणा-या महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्की होणार आहे.”

आमदार मनोहर भोईर म्हणाले, “विरोधकांवर टीका करण्यापेक्षा आपल्या उमेदवाराने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवली आहेत. बारणे यांनी मागील पाच वर्षात नवी मुंबई विमानतळ, घारापुरी बेट, तुंगी सारख्या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचवणे, जेएनपीटी रस्ता, पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी अशी अनेक महत्वाची कामे केली आहेत. देशात शांतता ठेवण्यासाठी, सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा आणखी उंचावण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार यायला हवे. राष्ट्रवादी, काँग्रेस पक्ष हे घोटाळेबाज पक्ष आहेत. त्यांना पुन्हा एकदा निवडून येऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा आहे. त्यामुळे स्वच्छ आणि पारदर्शक उमेदवाराला सर्वांनी निवडून द्यावे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like