Pimpri : पराग पाटील एशिया पॅसिफिक मास्टर गेम्ससाठी प्रतिकूल परिस्थितीतही तयार

देशासाठी 11 आंतरराष्ट्रीय पदकांची कमाई करणा-या पाटील यांचे आथिर्क मदतीचे आवाहन

एमपीसी न्यूज – एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स येत्या 7 ते 15 सप्टेंबर 2018 दरम्यान मलेशियामधील पेनांग येथे होणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवडमधील आंतरराष्ट्रीय प्रौढ खेळाडू पराग पाटील यांची जोरदार तयारी सुरु आहे. आजवर त्यांनी देशासाठी 11 आंतरराष्ट्रीय पदके मिळविली आहेत. मात्र देशाने त्यांची कसलीही दखल घेतली नाही. आर्थिक परिस्थिती बिकट असून देखील पाटील यांनी केवळ देशाची मान उंचावण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

पेनांग येथे होणा-या एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये जगभरातून 57 देश सहभागी होणार आहेत. या स्पर्धांमध्ये 30 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. पाटील यांनी या स्पर्धेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, लांब उडी आणि तिहेरी उडी या चार मैदानी स्पर्धा प्रकारांमध्ये सहभाग घेतला आहे. भारतातून एकूण 30 खेळाडू या स्पर्धेसाठी जाणार आहेत. पाटील यांना कोणत्याही संस्थेने आतापर्यंत प्रायोजकत्व दिले नाही. शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. परंतु याचा कोणताही परिणाम ते आपल्या सरावावर होऊ देत नाहीत.

पराग पाटील यांनी 2013 साली इटली येथे झालेल्या एशिया पॅसिफिक मास्टर गेम्समध्ये एक रौप्य, दोन कांस्य पदके मिळवली आहेत. 2015 साली ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य पदके मिळवली आहेत. 2017 साली न्यूझीलंड येथे आयोजित एशिया पॅसिफिक मास्टर गेम्स स्पर्धेत लांब उडी मारताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. दुखापतच्या दुसऱ्या दिवशी त्यांची तिहेरी उडी स्पर्धा होती. गुडघ्याची दुखापत गंभीर असताना देखील त्यांनी चांगली कामगिरी करत भारतासाठी एक रौप्य पदक मिळवले.

येत्या सप्टेंबर महिन्यात होणा-या स्पर्धेसाठी त्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. देशासाठी खेळणा-या या खेळाडूला समाजातील प्रत्येक हाताने आपापल्या कुवतीनुसार जर आर्थिक मदत केली, तर पाटील यांचा खेळण्याचा उत्साह आणखी द्विगुणित होईल. पराग पाटील यांना मदत करण्यासाठी खालील खात्यावर रक्कम जमा करावी.
नाव – पराग पाटील (7798444450)
बँक – आयसीआयसीआय बँक (चिंचवड शाखा)
खाते क्रमांक – 032101608266
आयएफएससी कोड – ICIC0000321

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.