Param Bir Singh letter : परमबीर सिंग यांच्या ईमेल पत्रावर स्वाक्षरी नाही

एमपीसी न्यूज : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत.

त्यावरुन भाजप नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केलीय. पण परमबीर सिंग यांच्या या पत्रावर त्यांची स्वाक्षरी नसल्यानं ते पत्र सिंग यांनीच पाठवलं आहे का? असा सवाल विचारला जात आहे. इतकच नाही तर मुख्यमंत्री कार्यालयाला ज्या मेल आयडीवरुन हे पत्र मिळालं त्याबाबतही संभ्रम असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, शरद पवार, उध्दव ठाकरे यावर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

परमबीर सिंग यांच्या या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी ४.३७ वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे .

त्याचप्रमाणे परम बीर सिंग यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वास्तविक पाहता परम बीर सिंग यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता [email protected] असा आहे त्यामुळे आज प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.