Pimpri : मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग महत्वाचा – वंदना चक्रवर्ती

तीन महिला रत्नाचा 'निरंजना' पुरस्काराने गौरव; ज्ञानप्रबोधिनी पालक महासंघ, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा उपक्रम

एमपीसी न्यूज –  मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढल्याशिवाय मुलांची प्रगती होणार नाही. चार भिंतीत दिलेले शिक्षण समाजात रुजायला हवे. विद्यार्थ्यांमधील संस्कार समाजात उतरायला हवेत. त्यासाठी शिक्षकांची देखील जबाबदारी महत्वाची आहे, असे मत एसएनडीटी विद्यापीठाच्या माजी प्रकुलगुरू वंदना चक्रवर्ती यांनी व्यक्त केले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या तीन महिला रत्नांचा सन्मान आणि कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी चक्रवर्ती बोलत होत्या.

ज्ञानप्रबोधिनी पालक महासंघ, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड यांच्या वतीने वंदना चक्रवर्ती, रजनी परांजपे, वीणा गोखले यांचा ‘निरंजना पुरस्कारा’ने ज्ञान प्रबोधिनी निगडीचे केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. ज्येष्ठ लेखक, निवेदक विश्वास मेहेंदळे यांनी पुरस्कारप्राप्त महिला रत्नांची मुलाखत घेतली. कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा रेखा मित्रगोत्री, मुक्ती पानसे, माधवी पोतदार, मनोज देवळेकर, प्रतिभा जोशी दलाल, सावित्री रघुपती, भारती फरांदे, नगरसेविका शलजा मोरे, राजश्री ओझर्डे आदी उपस्थित होते.

वंदना चक्रवर्ती म्हणाल्या की, जगातील 80 देशांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक भारतात प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. अजूनही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. शिक्षणाच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाचे परिवर्तन होणारे शिक्षण असावे. ज्ञानार्जन करणे म्हणजे शिक्षण नाही, तर विद्यार्थ्यांना अनुभव देखील द्यायला हवे. काहीजण अडचणींचा बाऊ करतात. पण अडचणी सगळ्यांनाच असतात. त्यातून खचून न जाता सातत्याने काम करत राहायचं. समाजासाठी आपण किती उपयोगी पडू शकतो, हे ओळखून आपण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण कधीही थांबवू नये. आपली बलस्थाने ओळखून सतत काही ना काही शिकत राहिले पाहिजे. ”

रजनी परांजपे म्हणाल्या, ‘पालकांची परिस्थिती गरीब असते, पण मुलांची बौद्धिक परिस्थिती गरीब नसते. त्यांना शिक्षणाची आवड असते. अशी मुले शाळा शिकून आपले भविष्य घडवतात. ज्यांना शाळेची तोंडओळख होणार नाही अशा मुलांपर्यंत पोहोचून त्यांना साक्षर करायचं आणि शाळेची गोडी निर्माण करायची हे काम मागील तीस वर्षांपासून ‘डोअर स्टेप स्कूल’च्या माध्यमातून सुरू आहे. मुलांच्या कलाने शिकवले तर ती समृद्ध होतात. आकलन आणि अभिव्यक्ती वाढविण्यासाठी वाचन महत्वाचं आहे. मुलांना चांगल्या प्रकारे वाचता यायला हवं. ज्या मुलांचे पालक शिक्षणात रुची घेत नाहीत, त्या मुलांचं भविष्य अंधारातच राहतं. स्वातंत्र्याला सत्तर वर्ष झाली पण अजूनही आपल्या शासनाला अशिक्षितपणा हटवता आला नाही. घर आणि शाळा या दोनच संस्था माणसे घडवतात आणि शिकलेली माणसे देश घडवतात. शिक्षकांच्या चारित्र्यातून विद्यार्थी नैतिकता शिकतात. ते शिकवण्याचे काम शिक्षकांनी करावे, असा सल्ला देखील त्यांनी दिला.

वीणा गोखले म्हणाल्या, “ज्या सामाजिक संस्था समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यांचे कार्य प्रदर्शनाच्या माध्यमातून पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘देणे समाजाचे’ हा उपक्रम सुरू झाला आहे. देणे समाजाचे उपक्रमाच्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्थांना लाखो रुपयांचा मदत निधी मिळाला. त्यातून त्या संस्थांना उर्जितावस्था मिळाली आहे. आयुष्यातील प्रत्येक दुःखावर मात करण्यासाठी कुटुंबाने साथ दिली. प्रत्येक अडचण आपल्याला समृद्ध करते. अनेक वेळेला दिसण्यापुढे आपलं कर्तृत्व बाजूला पडतं, ही खेदाची बाब आहे. विद्यार्थ्यांमधील कल ओळखून त्याला शालेय जीवनापासून त्यासाठी सक्षम करावे. प्रत्येक परिस्थितीत मुलांना खंबीरपणे उभे राहण्याचे बळ मिळावे, अशी शिकवण द्यायला हवी.”

सूत्रसंचालन शीतल कापशीकर यांनी केले. मनोज देवळेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.