Maval: अजितदादांचे पुत्र पार्थ मावळच्या रणांगणात उतरणार?

अजितदादांचे सूचक विधान 

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तिसरी पिढी आता राजकरणात सक्रिय होत आहे. पवारांच्या दुस-या पिढीतील अजित पवार राज्याच्या तर सुप्रिया सुळे केंद्राच्या राजकारणात सक्रिय आहेतच. दादांचे पुतणे रोहित पवार पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आता स्वत: अजित पवार यांचे पुत्र पार्थ मावळ लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, याबाबत आपले पार्थ याच्याशी काही बोलणे झाली नाही. आपण कोणावर निर्णय लादू नये, जर कोणी निर्णय घेत असेल तर आपण त्यांना रोखू शकत नाही, असे सूचक विधान अजित पवार यांनी मुंबईत एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवडचा परिसर येतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या परिसराचे अनेक वर्ष लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 पर्यंत शहराचा भाग बारामती लोकसभा मतदार संघात येत होता. त्यानंतर पुर्नरचना झाल्यानंतर मावळ लोकसभा मतदार संघाची स्थापना झाली आहे. 2009 मध्ये शिवसेनेकडून गजानन बाबर आणि 2014  मध्ये श्रीरंग बारणे निवडून आले आहेत.  आता मावळ मतदार लोकसभा मतदार संघातून खुद्द माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र राजकारणात एंट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराकडे लक्ष दिले आहे. पक्षाच्या कार्यालयात दोन ते तीन वेळा ते येऊन देखील गेले आहेत. त्यामुळेच ते मावळ लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.

‘माझ्या मुलांनी राजकारणात येऊ नये, असे मला वाटते. परंतु माझे हे मत असले तरी आताची पिढी स्वतःचा निर्णय स्वतः घेत असते असे सांगत अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे, याचाही विचार करावा लागतो. याबाबत पार्थशी बोलणे झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.