Talegaon Dabhade: पक्षाने निर्णय घेतल्यास निवडणूक लढविण्यास तयार – पार्थ पवार

पार्थ पवार यांच्या पहिल्या सदिच्छा भेटीने मावळात उत्साहाचे वातावरण

एमपीसी न्यूज – पक्षाने निर्णय घेतल्यास मावळ लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या पार्थ अजित पवार यांनी आज पत्रकारांनी खोदून खोदून विचारल्यानंतर अखेर मान्य केले.

कामशेत येथील एका कार्यक्रमास हजर राहून नाशिकला जात असताना पार्थ पवार यांनी आज प्रथमच तळेगाव दाभाडे येथे सदिच्छा भेट दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी पवार यांची भेट घेऊन त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला.

त्यांच्या समवेत आई सुनेत्रा पवार, पुण्याचे नगरसेवक बाबूराव चांदेरे, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, शहराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव भोंगाडे, महिला शहराध्यक्ष सुनीता काळोखे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, कार्याध्यक्ष संतोष मुऱ्हे, तालुकाध्यक्ष सुनील दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, वैशाली दाभाडे आदी उपस्थित होते.

तळेगाव दाभाडे येथे पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना पार्थ पवार म्हणाले की, उमेदवारी अगर तत्सम विषय माझ्या डोक्यात नाहीत. अजून तसे काहीही ठरलेले नाही. नंतर बोलू, मला आज तसं काही बोलायचं नाही. येथील विविध अडचणी, प्रश्न समजून घेऊन, त्यांचा प्रथम अभ्यास करायचा आहे. निवडणुकीबाबत दोन वर्षांनंतर बघू, असे सांगत त्यांनी विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

कार्यकर्त्यांच्या आग्रही भूमिकेमुळेच येथपर्यंत आलो आहे. निवडणुकीपेक्षा इकडचे प्रश्न काय आहेत ते समजून घ्यायचे आहेत. आपण पक्षादेशानुसार काम करणार आहोत, असा सावध पावित्रा त्यांनी घेतला होता. निवडणूक लढवायची मला घाई नाही, मात्र पक्षाने निर्णय घेतल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत, असेही त्यांनी मान्य केले.

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे काम करण्याचा माझा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. पत्रकारांच्या अन्य प्रश्नांना उत्तरे देण्याचे त्यांनी टाळले.

यावेळी बबनराव भेगडे, संतोष भेगडे यांनी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचे स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.