Chinchwad : चिंचवडमध्ये मंगळवारी ‘ईव्हीएम’विरोधी परिषद

विविध संघटना होणार सहभागी  

एमपीसी न्यूज – मुंबई, पुणे येथील यशस्वी परिषदांच्या आयोजनानंतर आता चिंचवडमध्ये ईव्हीएमविरोधी लढ्याचे रणशिंग फुंकले जाणार आहे. त्यासाठी येत्या मंगळवारी (दि. 16) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये शहरातील विविध पक्ष व संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात सायंकाळी पाच वाजता ही परिषद होणार आहे. परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत राजन खान हे असतील. परिषदेला आयटी डेटा व ईव्हीएम तज्ज्ञ डॉ. अनुपम सराफ, आम आदमी पक्षाचे राज्य समन्वयक धनंजय शिंदे  हे मार्गदर्शन करणार आहेत. तर, संविधान व कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे हे या संदर्भातील कायदेविषयक बाब समजावून सांगणार आहेत.

याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 2019 मध्ये कोणत्याही प्रकारची दृश्य-अदृश्य लाटा नसताना पूर्वीपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या.  हा नुसता चमत्कारच नाही. तर, अगदी ठरवून झालेली घटना आहे. याला ईव्हीएमचा वापर जबाबदार आहे.  यामुळे अनेकांचा आता या देशातील निवडणुकांवरचा विश्वास उडायला सुरूवात झाली आहे. भाजपची आता हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू झाली आहे. ईव्हीएमद्वारे इथून पुढे निवडणुका नकोत. नाहीतर आम्ही या निवडणुकीवर बहिष्कार घालू, असे पत्रकात म्हटले आहे.  परिषदेच्या आयोजनात डॉ. सुरेश बेरी, क्षितीज यामिनी शाम, प्रकाश पठारे, अ‍ॅड. मिलिंद ओव्हाळ यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.