BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : सुनील शेळके यांच्या गावभेट दौऱ्याला मिळणाऱ्या प्रतिसादाची पक्षश्रेष्ठींकडून दखल

राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यापुढे उमेदवारी टिकविण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले युवा नेते व तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सुरू केलेल्या गाव भेट दौऱ्याला गावोगाव मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. भाजपमध्ये मावळच्या उमेदवारीबाबत परिवर्तनाचे संकेत मिळत असल्याने भाजप व शेळके समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शेळके यांनी तालुक्यात गेल्या पाच वर्षांत केलेली विविध कामे, सातत्याने ठेवलेला जनसंपर्क व राजकीय मोर्चेबांधणी यामुळे त्यांनी मावळचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्यापुढे भाजप उमेदवारी मिळविण्यासाठी मोठे आव्हान उभे केले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भेगडे यांना राज्यमंत्रिपद मिळाल्याने त्यांचीच उमेदवारी निश्चित होईल, असे मानले जात होते. मात्र, शेळके यांनी पक्षाचा झेंडा हातात घेऊन गाव भेट दौरा सुरू केला. तालुक्यात विविध गावांमध्ये शेळके यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत असून त्यांना मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाची दखल पक्षनेतृत्वालाही घ्यावी लागली आहे. शेळके यांच्याबरोबरच भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनीही आमदारकीच्या उमेदवारीवर दावा केला आहे. त्यामुळे राज्यमंत्री भेगडे यांच्यापुढे उमेदवारी टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

मावळात भाजपने आतापर्यंत कोणत्याही आमदाराला दोनपेक्षा अधिक वेळा उमेदवारीची संधी दिलेली नाही. भाजपने रुपलेखा ढोरे यांना उमेदवारी नाकारून दिगंबर भेगडे यांना आमदारकीची उमेदवारी दिली होती. दोनवेळा आमदार झालेल्या दिगंबर भेगडे यांना डावलून बाळा भेगडे यांना उमेदवारी दिली होती. भेगडे यांना दोनदा संधी मिळाल्यानंतर अगदी निवडणुकीच्या तोंडावर राज्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे त्यांना हॅटट्रिकची संधी मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. मात्र, दरम्यानच्या काळात तालुक्यात आमदारकीच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार निर्माण झाल्यामुळे भेगडे यांच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. हे अडथळे दूर करून पक्षाची उमेदवारी तिसऱ्यांदा मिळविण्यासाठी भेगडे यांना प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे.

बाळा भेगडे यांना पक्षाने दोन वेळा आमदारकी तसेच राज्यमंत्रिपद देऊन पुरेपूर न्याय दिलेला आहे. त्यामुळे पक्षाने मावळातून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, अशी मावळच्या जनतेची आग्रही मागणी आहे. भेगडे यांच्या दहा वर्षातील कामगिरीबद्दल तालुक्यातील मतदार समाधानी नाहीत. त्यामुळे त्या नाराजीचा फटका पक्षाला बसू शकतो. पक्षाने नव्या दमाच्या, विकासाची दृष्टी असलेल्या, तालुक्यातील शेवटच्या मतदारापर्यंत सातत्याने संपर्कात असलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारीची संधी दिली तर पक्षाच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळेल, अशी चिन्हे मावळामधे दिसून येत आहे.
भाजपमधील इच्छुकांच्या मुलाखती होत असताना सर्वच इच्छुकांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार असून पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेताना कोणता निकष लावतात, यावरच मावळच्या उमेदवारीबाबतचा निर्णय आवलंबून आहे. तूर्त बाळा भेगडे यांच्यासाठी उमेदवारीची शर्यत सोपी नसल्याची चर्चा भाजप वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

 

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like