Chinchwad : पसायदान ही विश्वप्रार्थना व्हावी – ह.भ.प. किसनमहाराज चौधरी

एमपीसी न्यूज – “पसायदान ही विश्वप्रार्थना व्हावी; कारण त्यातल्या प्रत्येक शब्दात मंत्रासारखे सामर्थ्य आहे!” असे मत ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. किसन महाराज चौधरी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.

चिंचवड येथील साई मंदिर प्रांगणात पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘पसायदान’या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना ह.भ.प. किसनमहाराज चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी जयवंतराव मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दामोदर येवले तसेच दिलीप सुगवेकर, प्रदीप गांधलीकर आदी उपस्थित होते.

ह.भ.प. किसनमहाराज चौधरी म्हणाले की, “भारताची परंपरा सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे. देशाला माता म्हणण्याचे संस्कार केवळ भारतातच आहेत. संत ज्ञानेश्वर माउलींनी साडेसातशे वर्षांपूर्वी नऊ हजार ओव्यांचा’ज्ञानेश्वरी’हा ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर पसायदान मागितले. पसायदान म्हणजे प्रसाद किंवा मागणे होय. संत म्हणजे जीवनात फुललेल्या वसंताप्रमाणे असतात. ज्या प्रमाणे वसंत फुलला की प्रकृती सुधारते, त्याच प्रमाणे संतांचे आगमन झाल्यावर संस्कृती सुधारते.

संतांच्या सहनशीलतेला अंतच नसतो. संतांच्या सुविचाराला अंत नसतो. बरेचदा संतांची तुलना ही पंतांबरोबर केली जाते; परंतु पंत हे डोक्याने मोठे असतात; तर संत हे हृदयाने मोठे असतात. संत ज्ञानेश्वर हे पंतांचे पंत आणि संतांचे संत होते म्हणून जेव्हा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर माउलींनी आपल्या गुरूंकडे पसायदान मागितले. ज्ञानेश्वरी हा अलौकिक ग्रंथ आहे म्हणून नामदेवांनी म्हटले की, ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी | एक तरी ओवी अनुभवावी ||

‘सामान्य प्रापंचिक माणसांचे मागणे सामान्य असते; तर संतांचे मागणे असामान्य असते म्हणून तुकोबा म्हणतात, ‘हेची दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||’ माउलींनी संपूर्ण विश्वासाठी मागणे मागताना पसायदान म्हटले. यातील विश्वात्मक परमेश्वर म्हणजे माउलींचे गुरू निवृत्तीनाथ होय. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक अध्यायात माउली आपल्या गुरूची स्तुती करतात; कारण त्यांच्या जीवनात गुरूंचे स्थान खूप मोठे आहे. वाग्यज्ञाने तुम्ही प्रसन्न व्हा असे माउली गुरूंना म्हणतात. देणारा आणि घेणारा म्हणजे गुरू आणि शिष्य दोन्ही आनंदी आहेत म्हणून ‘तोषोनी मज द्यावे पसायदान हे…’ असे माउली म्हणतात.

अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा असे मागणे माउली मागतात. संतांचा प्रपंच हा कमलपत्रवत म्हणजे ज्या प्रमाणे चिखलात असून कमळ स्वच्छ असते तसा असतो. ‘असोनी नसावे…’ या प्रकारे संत प्रपंचात असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वधर्माचा प्रसार व्हावा, असे माउलींनी मागितले. या ठिकाणी स्वधर्म म्हणजे जीवनातील आपल्या वाट्याला आलेले विहीत कर्म होय. अर्थातच आपले कर्म निष्ठेने पाळून कर्मानंद प्रत्येकाच्या वाट्याला यावा, असे माउली म्हणतात.

जे ज्याला पाहिजे ते त्याला मिळाले की माणसे आनंदी होतात म्हणून म्हटले आहे की, ‘जो जे वांछिल तो तें लाहो प्राणिजात’ ईश्वरनिष्ठ माणसे एकत्र यावीत म्हणजे आनंद निर्माण होतो, असे माउलींना वाटते. अनेक सुंदर उपमा, अलंकार वापरून माउलींनी पसायदान मागितले आहे!”दृष्टांत, दाखले, किस्से, संतवचने, भारुड, विनोद उद्धृत करीत ह.भ.प. किसनमहाराज चौधरी यांनी आपल्या रसाळ निरूपणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संयोजन विलास पाटील, दशरथ जमदाडे, गजानन कुलकर्णी, प्रकाश मळेकर, अप्पा कुलकर्णी  यांनी केले.राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष पागळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.