NDA Passing Out Ceremony: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराचे पालन करत साधेपणाने NDA चा दीक्षांत सोहळा

Pune: Passing out ceremony of 138th course of NDA was conducted today in a scaled-down manner following the norms of social distancing in view of Covid 19 pandemic

एमपीसी न्यूज – कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) 138 व्या बॅचचा दीक्षांत सोहळा आज अत्यंत साधेपणाने व सुरक्षित अंतराचे नियम पाळून साजरा करण्यात आला. दरवर्षी हा दिमाखदार सोहळा अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. NDA च्या इतिहासात यंदा प्रथमच हा सोहळा साधेपणाने साजरा झाला.

NDA चा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या छात्रांचे शानदार संचलन, विविध प्रकारची साहसी प्रात्यक्षिके, डोळ्यात भरणारी शिस्त, मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती व मार्गदर्शन, पत्रकार व छायाचित्रकारांची गर्दी, आपल्या मुलांचे कौतुक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने देशभरातून जमलेले पालक व कुटुंबीय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पदवी प्राप्त झाल्यानंतर छात्रांकडून टोप्या आकाशात भिरकवत केला जाणारा जल्लोष हे दरवर्षी असणारे चित्र यंदा पाहायला मिळाले नाही.

कोविड – 19 जागतिक महामारी व देशभर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा दीक्षांत सोहळा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय NDA प्रशासनाने घेतला. कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत दीक्षांत संचलन व कार्यक्रम यंदा साधेपणाने होईल आणि छात्रांचे पालक त्यामध्ये सहभागी होणार नाहीत, असे NDA ने गुरुवारीच जाहीर केले होते.

“संरक्षण दलाची एक प्रशिक्षण संस्था म्हणून NDA ने  लवकरात लवकर नवीन परिस्थितीशी जुळवून घेतले आहे परंतु तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या छात्रांचा सत्रातील अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा छोटेखानी समारंभ आयोजित केल्याचे NDA ने स्पष्ट केले. देशव्यापी लॉकडाऊनमुळे छात्रांच्या पालकांना या समारंभास उपस्थित राहणे शक्य होणार नव्हते, असे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.