Paud : खवल्या मांजराची टीप पोलिसांना दिल्याच्या संशयातून दोघांचा खून!

कुंडलिका व्हॅली दरीत कारमध्ये आढळलेल्या दोन मृतदेहांच्या खुनाचा झाला उलगडा

एमपीसी न्यूज – ताम्हिणी घाटात कुंडलिका व्हॅली दरीत जळालेल्या कारमध्ये दोन जळालेले मृतदेह सापडले. हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. खवल्या मांजराची टीप पोलिसांना दिल्याच्या संशयावरून साथीदार मित्रांनीच दोघांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अशोक देऊ हिलम (वय 31, रा. वाकी वाडीवाडी वाडी, ता. माणगाव, जि. रायगड), गणेश रघुनाथ वाघमारे (वय 27, रा. मढाळी आदिवासी वाडी पुगाव, ता. रोहा, जि. रायगड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, गणेश सुनील पवार (रा. सुतारवाडी वाकी, ता. माणगाव, जि. रायगड), शंकर हिलम (रा. सुतारवाडी वाकी, ता. माणगाव, जि. रायगड), लहान्या सोनू जाधव (रा. निजामपूर वाकी आदिवासी वाडी, ता. माणगाव, जि. रायगड) हे आरोपी अद्याप फरार आहेत.

विजय आबा साळुंखे (वय 32, रा. बांधा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), विकास विलास गोसावी (वय 28, रा. निपाणी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाष आबा साळुंके (वय 35, रा. बांधा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) यांनी याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी गावाजवळ ताम्हिणी घाटात 3 जुलै 2019 रोजी विजय आणि विकास या दोघांचे मृतदेह एका जळालेल्या कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळले. या दोघांची 10 जुलै रोजी ओळख पटली. तसेच आर्थिक व्यवहारातून खून करून एम एच 07 / ए जी 1477 या कारमध्ये दोघांचे मृतदेह टाकून आरोपींनी कार पेटवून दिल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे पौड पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातीला आरोपी अशोक आणि गणेश यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या तीन साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याचे कबुल केले.

आरोपी अशोक आणि मयत हे खवले मांजराची एकत्रितपणे तस्करी करण्याचे काम करत होते. त्यांच्यात झालेल्या व्यवहाराच्या वादातून मयत विजय आणि विकास यांनी त्यांचे साथीदार खवल्या मांजर घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे त्यांना पोलिसांनी पकडले, असा अशोक याला संशय होता. त्या रागातून अशोक याने खवले मांजराचे खवले ताम्हिणी घाटात आढळल्याचे सांगून विजय आणि विकास या दोघांना ताम्हिणी घाटात नेले.

ताम्हिणी घाटातील कुंडलिका व्हॅलीजवळ अशोक याने त्याच्या अन्य चार साथीदारांना बोलावून विजय आणि विकास या दोघांचा गळा आवळून व मारहाण करून खून केला. दोघांच्या खिशातील रक्कम काढून घेतली. एकाचा मृतदेह कारच्या डिक्कीमध्ये तर एकाचा मृतदेह मागच्या सीटवर टाकला. दोन्ही मृतदेहांसह कार कुंडलिका व्हॅली दरीत ढकलून दिली. काही अंतर खाली गेल्यानंतर कार थांबली. तिथून ढकलून देखील आरोपींना कार दरीत ढकलता नाही. त्यामुळे आरोपींनी कारवर पेट्रोल टाकून गाडी पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

पौड पोलिसांनी सुरुवातीला हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास करून दोघांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जगताप, पोलीस कर्मचारी मोरेश्वर इनामदार, मुकुंद अयाचित, सचिन गायकवाड, शब्बीर पठाण, राजू पुणेकर, विशाल साळुंके, नितीन भोर, गुरु जाधव, प्रमोद नवले, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.