PavanaNagar : किरकोळ कारणावरुन पाच जणांना मारहाण

एमपीसी न्यूज – पवनानगर येथील ठाकूरसाई गावात किरकोळ कारणावरुन टोळक्याने एका घरावर केलेल्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत. तर दगडफेक केल्याने घराचे पत्रे देखील फुटल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पवनानगर येथील पत्रकार रवी ठाकर हे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भावाच्या अल्टो गाडीतून मुलांसह शेतावरी घरी जात असताना गेव्हंडे गावाकडील अरुंद रस्त्यावर समोरुन एक स्विफ्ट कार आली. दोन्ही गाड्या एकाचवेळी जाणे शक्य नसल्याने आणि ठाकर यांच्या गाडीच्या मागे तीन-चार गाड्या असल्याने त्यांच्या भावाने समोरील स्विफ्ट कारचालकाला गाडी मागे घेण्याची विनंती केली. मात्र, या कारचालकाने गाडी मागे घेण्याऐवजी त्या गाडीतून दोघेजण खाली उतरले आणि त्यांनी ठाकर यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली.

  • यावेळी गावातील इतर लोक जमा झाल्यानंतर सदरचे युवक तुमच्याकडे बघून घेतो म्हणत गाडीतून निघून गेले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हेच युवक अन्य बारा-तेरा जणांचे टोळी हातात लाकडी दांडके, दगडी घेऊन ठाकर यांच्या घरावर चालून आले. घराच्या बाहेर उभे राहून शिवीगाळ करु लागले यावेळी घराबाहेर आलेले रवी ठाकर यांचे वडील नामदेव ठाकर, भाऊ दिनेश ठाकर, चुलत भाऊ विशाल ठाकर, अशोक ठाकर, राजु ठाकर यांना लाकडी दाडकांनी मारहाण केली. यामध्ये नामदेव ठाकर यांच्या डोक्याला मार लागला तर इतरांच्या डोक्याला व पाठीला मार लागला आहे. भाडणं सोडविण्यासाठी गेलेल्या रवी ठाकर यांना देखिल हाताने मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी शिवली येथील निलेश येवले आणि राऊतवाडीतील अक्षय राऊत यांच्यासह बारा ते तेरा जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत याला पोलीसांनी अटक केली असून त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पवनानगर बिट अंमलदार दुर्गा जाधव तपास करत आहेत.

  • हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध
    पत्रकार रवी ठाकर आणि त्याच्या कुटुंबीयांवर झालेल्या हल्ल्याचा वडगाव मावळ, लोणावळा शहर, तळेगाव शहर, स्वाभिमानी पत्रकार या संघटन‍ाकडून निषेध नोंदवत आरोपीवर कडक करवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.