Sangavi News : सांगवीत भरणार पवनाथडी जत्रा

फेब्रुवारीमध्ये आयोजनास स्थायी समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी आयोजित केली जाणारी पवनाथडी जत्रा यंदा सांगवीत होणार आहे.  सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात  पवनाथडी जत्रा भरविण्यासासाठी स्थायी समितीने मान्यता दिली आहे. गेल्या तेरा वर्षापासून जत्रेचे आयोजन केले जाते.

पुणे शहरातील भीमथडी जत्रेच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पवनाथडी जत्रा भरविण्यास गेल्या 13 वर्षांपूर्वी सुरूवात केली. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने दरवर्षी पवनाथडी यात्रा घेतली जाते. महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी या जत्रेचे आयोजन केले जाते.

जत्रेच्या आयोजनासाठी केलेल्या तरतुदीमधून व प्रत्यक्ष येणाऱ्या खर्चास मान्यता घेण्यासाठी महिला बालकल्याण समितीने स्थायी समितीकडे शिफारस केली होती. त्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

पवनाथडी जत्रा पिंपरीतील एचए मैदान, भोसरीतील गावजत्रा मैदान आणि सांगवीतील पीडब्लू़डी मैदानावर वेळोवेळी झाली. परंतु, मागील पाच वर्षांपासून पवनाथडी जत्रा सांगवीत भरविली जात आहे. त्यामुळे सतत वाद झाले आहेत. यंदा ही जत्रा पिंपरीतील एचए मैदनावर भरवावी, अशी मागणी झाली होती. मात्र, तरीही सांगवीत जत्रा भरविण्यास मान्यता दिल्याने ठिकाणावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.