Pimpri : महापालिका पवनाथडी जत्रेचा करणार ‘इव्हेंट’

पॉईंट ऑफ व्हयू संस्थेची समन्वयकपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज –  महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने भरविण्यात येणा-या पवनाथडी जत्रेचा महापालिका यंदा ‘इव्हेंट’ करणार आहे. त्यासाठी ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’ या संस्थेची समन्वयकपदी नियुक्ती केली जाणार आहे. संस्थेची टीम मागील दोन महिन्यापासून जत्रेच्या आयोजनासाठी काम करत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यासाठी विविध कंपन्यांकडून स्पॉन्सरशिप घेतली जाणार आहे. त्यातून भव्य प्रवेशद्वार, श्रवणीय प्रचार गीत आणि उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने महापालिकेतर्फे मागील 12 वर्षांपासून पवनाथडी जत्रा भरविण्यात येते.  यंदा सांगवीतील पी.डब्लू.डी. मैदानावर  18 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पवनाथडी जत्रा भरविण्यात येणार आहे. परंतु, महापालिका यंदा जत्रेचा ‘इव्हेंट’ करणार आहे. त्यासाठी पॉइंट ऑफ व्ह्यू’ या संस्थेची समन्वयकपदी नियुक्ती केली जाणार आहे.

या संस्थेच्या टीमने मैदानाची पाहणी करून संपूर्ण जागेचा सर्वे केला आहे. 800 स्टॉल्स आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी लेआऊट डिझाईन केला आहे. पाच दिवसांच्या संपूर्ण कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली आहे. याखेरीज स्पॉन्सरशिप घेण्यासाठी अनेकांशी बोलणी सुरु आहे. स्पॉन्सरशिपच्या रकमेमधून भव्य प्रवेशद्वार, श्रवणीय प्रचार गीत आणि उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. विविध कंपन्या, बांधकाम व्यावसायीक, उद्योजकांशी स्पॉन्सरशिपबाबत चर्चा सुरु आहे.

स्टॉल धारकांकडून उत्तम काम करुन घेणे, जत्रेसाठी थीम्स, डिझाइन्स आणि ले-आउट््सकरिता मदत करण्याचे काम पॉइंट ऑफ व्ह्यू’ ही संस्था करणार आहे. त्या मोबदल्यात संस्थेला महापालिकेच्या कोणत्याही मानधनाची अपेक्षा असणार नाही. या संस्थेची समन्वयकपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.