Amit Thackeray: आशा सेविकांच्या मानधनासाठी अमित ठाकरे पुढे सरसावले, अजित पवारांना लिहिले पत्र

Pay at least Rs 10,000 monthly to 'Asha' workers- MNS leader Amit Thackeray आंध्र प्रदेश केरळ हरियाणा या राज्यांमध्ये मात्र 'आशा सेविकांना दर महिन्याला 4 हजार ते 10 हजार मोबदला मिळत आहे. मग महाराष्ट्रात अत्यल्प मानधन का?

एमपीसी न्यूज- आशा स्वयंसेविकांच्या मानधनाचा निर्णय घेताना तो महापालिका स्तरावर न घेता संपूर्ण राज्याच्या पातळीवर घ्यावा, म्हणजे विषमता निर्माण होणार नाही. आशा सेविकांना आत्मसन्मानाने जगता येईल यासाठी त्यांना किमान दहा हजार मासिक मोबदला द्यावा अशी मागणीही अमित ठाकरे यांनी पत्रातून केली आहे.

‘आशा’ स्वयंसेविकांनी मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेत मासिक मोबदला वाढवण्याची मागणी केली आहे. अमित ठाकरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर या पत्राची माहिती दिली आहे.

* अमित ठाकरे यांनी पत्रात काय म्हटलंय?

परवा काही ‘आशा’ स्वयंसेविका मला भेटायला आल्या होत्या. राज्यातील आरोग्य सेविकांना महिन्याला अडीच हजार रुपये मोबदला दिला जात आहे तर मुंबईतील आरोग्य सेविकांना महिन्याला फक्त 1600 रुपये मानधन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.


अशी स्थिती महाराष्ट्रात असताना आंध्र प्रदेश, केरळ, हरियाणा या राज्यांमध्ये मात्र ‘आशा सेविकांना दर महिन्याला 4 हजार ते 10 हजार मोबदला मिळत आहे. मग महाराष्ट्रात अत्यल्प मानधन का?

आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी या स्वयंसेविका ‘आरोग्य सैनिक’ बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड-19 च्या संकटकाळात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्या कामगिरीसाठी त्यांना विशेष भत्ता देखील देण्यात यावा.

सर्व महाराष्ट्रातील स्वयंसेविकांना एकाच न्यायाप्रमाणे मोबदला देण्यात यावा. त्यांना ताठ मानेने आयुष्य जगता यावे, यासाठी मिळणारा मोबदला वाढवून दिला पाहिजे.

राज्यातील साडेतीन हजार गटप्रवर्तकांनाही 15000 मासिक मानधन देण्याबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.