Payal Ghosh Accuses Anurag Kashayap – अनुराग कश्यपवर गैरवर्तनाचे पायल घोषचे आरोप

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून सिनेकलाकारांमधील ट्विटरयुद्ध जोरात सुरु आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कंगना रानावत आणि अनुराग कश्यप यांच्यामधील वाद जोरात सुरु आहे. कोणीच माघार घेण्यासाठी तयार नाही. अशातच अभिनेत्री पायल घोष हिने प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले आहेत.

पायलने ट्विट करत अनुरागवर हे आरोप केले असून सोबतच एका मुलाखतीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. इतकंच नाही तर या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणीही तिने केली आहे.

‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काहीतरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असं ट्विट पायलने केलं आहे.

त्यावर आता अनुराग कश्यपने ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘थोडी तरी मर्यादा बाळगा’ असं म्हणत अनुराग कश्यपने उत्तर दिलं आहे.

‘क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. चला काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत’, असं ट्विट अनुरागने प्रत्युत्तरादाखल  केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.