Pimpri : लोकअदालतीतून महापालिका तिजोरीत एका दिवसात 26 कोटी मालमत्ता कराचा भरणा 

एमपीसी न्यूज – थकित मालमत्ता कराची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी न्यायालयाच्या निर्देशानुसार पिंपरी महापालिकेतर्फे आयोजित केलेल्या लोकअदालतीमध्ये 701 मालमत्ताधारकांनी पाच कोटी 38 लाखाचा भरणा केला. तर, 4 हजार 1 मालमत्ताधारकांनी थकबाकीसह मागणीच्या कराचा 20 कोटी 62 लाख रुपयांचा संपूर्ण भरणा केला. त्यामुळे महापालिका तिजोरीत एक दिवसात 26 कोटी रुपयांचा भरणा झाला असून या मालमत्ताधारकांना दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात आली. 

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशासनुसार आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशावरुन राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी आणि तत्सम प्रलंबित तडजोड योग्य प्रकरणे मार्गी लावली जातात. मालमत्ता कर, पाणीपट्टी संबंधातील प्रकरणाचा न्यायालयामार्फत निवाडा करण्यात येतो. लोक अदालतीमध्ये थकित मालमत्ता कराच्या दंडावर (शास्ती) 90 टक्के सवलत देण्यात आली. त्यानुसार आकुर्डीतील महापालिका न्यायालयात आज (शनिवारी) लोकअदालत घेण्यात आली.

त्यामध्ये 701 लोकांची प्रकरणे मार्गी लावली. 701 मालमत्ताधारकांनी सवलत योजनेचा  लाभ घेत पाच कोटी 38 लाखाचा भरणा केला. तर, 4 हजार 1 मालमत्ताधारकांनी थकबाकीसह मागणीच्या कराचा 20 कोटी 62 लाख रुपयांचा संपूर्ण भरणा केला. महापालिका तिजोरीत एक दिवसात 26 कोटी रुपयांचा भरणा झाला असून या मालमत्ताधारकांना दंडावर (शास्ती)90 टक्के सवलत देण्यात आली.

दरम्यान, शास्तीकरामध्ये 90 टक्के माफी मिळणार असल्याचा गैरसमज झाल्याने नागरिक मोठ्या संख्येने तिथे जमा झाले होते. त्यामुळे काही गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी नागरिकांची समजूत काढली. तसेच शहरातील निवासी, व्यावसायिक,  औद्योगिक सर्व अनधिकृत मालमत्तांचा पूर्वलक्षी प्रभावाने सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन न्यायाधीशांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.