Talegaon News : पिसीईटी – नूतनचा टीटीए समवेत सामंजस्य करार

एमपीसी न्यूजनूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) यांच्या समवेत टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन पुणे (टीटीए) यांचा नुकताच सामंजस्य करार झाला. उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील अंतर दूर करून त्यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे. या करारांतर्गत नूतन तळेगांव येथे इंडस्ट्रीइन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल (आयआयआयसी) स्थापन करण्यात आला आहे.

 

‘पीसीईटी’च्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव येथील (एनएमआयईटी) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ललितकुमार वाधवा आणि टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत घारपुरे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रसंगी ‘टीटीए’चे सचिव विलास रबडे, अनिल चैतन्य, नूतन ‘आयआयआयसी’चे समन्वयक आणि विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

 

या दोन्ही संस्थांमध्ये झालेला सामंजस्य करार ही एक संधी आहे. ‘टीटीए’चा हा तिसरा सामंजस्य करार आहे. संशोधनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची देशाला गरज असून, त्यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्थांतील संवाद वाढणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल व्हेइकलवर संशोधन व तीनचाकी विद्युत वाहनासाठी किट निर्मितीचे काम सुरु आहे तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उद्योगांशी संवाद साधून तेथील संशोधन व्यवसायाच्या रूपात समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आणि विद्यार्थ्यांना केवळ नोकरी साठी तयार न करता त्यांना उद्योजक बनविण्याचा आमचा निर्धार असल्याचे यशवंत घारपुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

नूतन संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के तसेच पिसीईटी ट्रस्ट चे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, कार्यकारी संचालक डॉ गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला आहे. पिसीईटी – नूतन प्लेसमेंटचे डीन डॉ शीतलकुमार रवंदळे, राजेश सर्वज्ञ यांनी हा करार घडवून मोलाची कामगिरी बजावली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.