PCMC : शाळांमधील 30 टक्के शिक्षकांच्या ऑनलाइन पध्दतीने होणार बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) शहरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधील शिक्षिकांच्या आगामी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ऑनलाइन पध्दतीने बदल्या करण्यात येणार आहेत. यामध्ये तब्बल 30 टक्के शिक्षकांच्या 31 मे पूवी बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

महापालिकेच्या शहराच्या विविध भागात 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक अशा 123 शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 45 हजारपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळांमध्ये 992 शिक्षक असून यामधील 300 शिक्षक व मुख्याध्यापकांच्या तर माध्यमिक शाळांमध्ये 129 शिक्षक असून 39 शिक्षक व मुख्याध्यापकांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.

Chikhali : जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्यू

याबाबत माहिती देताना शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे म्हणाले, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये 30 टक्के शिक्षकांना एकाच शाळेत काम करून अनेक वर्ष झालेली आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षांपूर्वी म्हणजे 31 मे पूर्वी पात्र शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या प्रथमच ऑनलाइन पध्दतीने बदल्या करण्यात येणार आहेत. ज्या शिक्षकाला एका शाळेत जास्त वर्ष झाली असतील, अशा शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेनुसार आणि समुपदेशन करून बदल्या केल्या जाणार आहेत.

अनेक शिक्षक आपल्या घरापासून लांब असलेल्या शाळेत नियुक्ती केल्यास विविध कारणांनी संबंधित शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ किंवा बदली रद्द करण्यासाठी विविध कारणे देतात. मात्र, यावेळी फक्त गंभीर आजार असलेल्या शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनाच घराजवळची शाळा देण्यात येणार आहे. यासाठी गंभीर आजार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किंवा महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता यांचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार असल्याची माहितीही शिक्षणाधिकारी नाईकडे यांनी (PCMC) दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.