Pimpri News : दररोज पाणीपुरवठ्याची ‘नोव्हेंबर’ची डेडलाईन चुकली; आता प्रशासन म्हणतेय फेब्रुवारीपर्यंत दररोज पाणीपुरवठा करु

एमपीसी न्यूज – दोन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांना नोव्हेंबर 2021 पासून दररोज पाणीपुरवठा करण्याची डेडलाईन महापालिका प्रशासनाने दिली होती. पण, ती डेडलाईन प्रशासन पाळू शकले नाही. फेब्रुवारी 2022 च्या अगोदर टप्प्याटप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल. त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल आणि तशा सूचना अधिका-यांना दिल्या जातील, असे महापालिका प्रशासनाने सांगितले.

शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी महापालिका पदाधिकारी आणि अधिका-यांची आज (गुरुवारी) बैठक झाली. महापौर उषा ढोरे, आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर हिरानानी घुले, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. पुढील वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा धरणात आहे. पाण्याची चिंता संपली. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला. त्यानंतर प्रशासनाने नोव्हेंबरअखेरपासून टप्या-टप्प्याने दररोज पाणीपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. परंतु, ती डेडलाईनही प्रशासन पाळू शकले नाही. शहरातील नागरिकांना फेब्रुवारीपर्यंत दररोज पाणीपुरवठा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी भूमिका प्रशासनाने मांडल्याचे मनसेचे चिखले यांनी सांगितले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे सांगून भाजपने सत्ता मिळविली. परंतु, सत्तेत आल्यानंतर चोवीस तास पाणीपुरवठा बाजूला ठेवले. त्याउलट दररोज पाणी देखील नागरिकांना देऊ शकले नाहीत. पाच वर्षांपूर्वी चालू झालेले प्रकल्पही भाजपला पूर्ण करता आले नाहीत. आंद्रा-भामा आसखेड धरणातील पाणी आरक्षणाला 2012-13 मध्ये मान्यता मिळाली होती. पण, या धरणातून प्रत्यक्षात आज देखील शहरवासीयांना पाणी मिळाले नाही. पाणी साठवण क्षमता नसलेल्या बैठ्या घरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याची मोठी अडचण होत आहे. दररोज पाणीपुरवठा करावा अशी नागरिकांची मागणी आहे. मागील पाच वर्षात सत्ताधारी भाजप दिलेली आश्वासने पूर्ण करु शकले नाही.

दरम्यान, मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी महापालिका प्रशासनाने खूप वेळ घेतला. आता शहरवासीयांना जास्त त्रास देऊ नये. लवकरात-लवकर दररोज पाणीपुरवठा सुरु करावा.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. चर्चा झाली तर, महापौर उषा ढोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.