PCMC : शहरातील 17 चाैकात बसवलेले एअर प्युरिफिकेशन फाउंटन धूळखात

एमपीसी न्यूज –  दूषित हवा शुद्ध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहरातील ( PCMC) विविध 17 चौकांत एअर प्युरिफिकेशन फाउंटन उभारण्यात आले आहे. त्या यंत्राद्वारे पाण्याचे तुषार हवेत सोडून हवेतील धुळीचे कण कमी केले जाणार आहे. ते फाउंटन उभारून सव्वा तीने महिने झाले तरी, अद्याप ते सुरू झालेले नाहीत.

दिल्लीच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एअर प्युरिफिकेशन फाउंटन उभारले आहेत. हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून नवनवीन संकल्पना राबविल्या जात आहेत. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) शहरातील 17 चौकांत 12 ड्राय मिस्ट टाईप वॉटर फाउंटन आणि 9 ठिकाणी एअर प्युरिफीकेशन फाउंटन उभारण्यात आले आहेत. दर दहा मिनिटांनी या फाउंटनद्वारे पाण्याचे तुषार उडविले जातात. त्यामुळे हवेतील धुळीकण जड होऊन खाली बसतात. वर्दळीच्या चौकांत आकर्षक रचनेतील फाउंटन बसविण्यात आले आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी त्याखाली 500 ते 1 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. या कामासाठी 3 कोटी 90 लाखांचा खर्च झाला आहे.

Pimpri : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील मुस्लीम बांधवाकडून मोफत पाणी वाटप

फाउंटन उभारून सव्वा तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरी, अद्याप ते सुरू झालेले नाहीत. त्यावरील व्हर्टीकल गार्डनही सुकून चालले आहे. मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशनची 5 वाहने शहरात फिरत आहेत. पाण्याच्या टॅकरप्रमाणे असलेली ही वाहने रस्त्यांवर फिरून पाण्याचे तुषार उडवित आहेत. त्यामुळे ऐन उन्हातील हा गारवा वाहनचालकांना आल्हादायक वाटत आहे.

या चौकात फाउंटन

पिंपरी चौक, भोसरी चौक, खंडोबा माळ चौक, नाशिक फाटा, चिंचवड स्टेशन, कस्पटे चौक, होळकर चौक, नेहरूनगर चौक, चिखली आरटीओ चौक, चिंचवडगाव चौक, रावेत-भोंडवे चौक, मोशी गोदावून चौक, रांका गॅस स्टेशन, विसर्जन घाट चौक, कोकणे चौक, तळवडे चौक, एम. एम. स्कूल चौक.

वातावरणात तरंगणारे धुलीकण श्वसनाद्वारे फुफ्फसात जातात. त्यामुळे नागरिकांना गंभीर आजार होतात. हे धुळीचे कण पाण्याच्या तुषारामुळे पाण्यासोबत जड होऊन खाली जाऊन बसतात. त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. त्यासाठी शहरात अधिक वर्दळीच्या चौकांत एअर प्युरिफिकेशन फाउंटन उभारण्यात आले आहेत. त्याची चाचणी सुरू असून, ते लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे, असे पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी ( PCMC) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.