PCMC Anniversary: ग्रीन सिटी, बेस्ट सिटी, क्लीन सिटी, स्मार्ट सिटीनंतर आता मेट्रोनगरीकडे शहराची वाटचाल

 ग्रामपंचायत, नगरपालिका ते अल्पावधीतच महापालिका शहराचा प्रवास

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांच्या कुशीत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला आज (रविवारी) 38 वर्षे पूर्ण होत आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि आकुर्डी या चार ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करुन नगरपालिका, त्यानंतर अल्पावधीतच शहराचे महापालिकेत रुपांतर झाले. या प्रवासात शहराचा वेगाने विकास झाला. ग्रीन सिटी, बेस्ट सिटी, क्लीन सिटी, स्मार्ट सिटीची बिरुदे नावावर लागल्यानंतर आता मेट्रोनगरीकडे शहराची वाटचाल सुरु आहे.

शहर विकासाचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांच्या पुढाकाराने 4 मार्च 1970 ला नगरपालिका स्थापन करण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या 83 हजार 542 होती.

अण्णासाहेब मगर नगरपालिकेचे पहिले शासननियुक्त नगराध्यक्ष झाले, ते पाच वर्षे पदावर राहिले. 1978 च्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. श्री. श्री. घारे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले.

अल्पावधीतच लोकसंख्येच्या निकषानुसार  11 ऑक्टोबर 1982 रोजी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. 1982 ते 1986 चार वर्षे हरनामसिंह प्रशासक होते. त्यांनी शहरात झाडे लावली. त्यामुळे ग्रीन सिटी अशी शहराची ओळख झाली होती.

1986 मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. ज्ञानेश्वर लांडगे शहराचे पहिले महापौर झाले. तर, बाबासाहेब तापकीर स्थायी समितीचे पहिले अध्यक्ष झाले.

औद्योगिकनगरी, कामगार चळवळीचे केंद्र

शहरात हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, गरवारे अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, मोठ-मोठे कारखाने आले. औद्योगिकनगरी म्हणून नावारूपाला येत असलेल्या या शहरात पोटापाण्यासाठी हजारोंच्या संख्येने कामगार येत होते.

देशातील व राज्यातील सर्वात मोठे उद्योग क्षेत्र शहरात सुरु झाले. औद्योगिकनगरी हे नाव धारण करणाऱ्या शहराची घौडदौड सुरु झाली.

उद्योग, नोकरी, व्यावसाय इत्यादी पूरक उद्योगांसाठीही नागरिकांच्या स्थलांतराने शहराची  लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली. जकातीच्या माध्यमातून नगरपालिकेला मोठा महसूल मिळू लागला. त्यातून शहराचा कायापालट झाला.

औद्योगिकनगरीत कामगारांची संख्या मोठी होती. त्यामुळे शहर कामगार चळवळींचे केंद्र बिंदू होते. कामगारांचे लाखोंचे मोर्चे निघायचे. डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटना प्रबळ होत्या.

आता संघटना अस्तित्वात राहिल्या नाहीत. बदलणारे कामगार कायदे, करप्रणाली, सुविधा मिळत नसल्याने कारखाने चाकण पट्ट्याकडे वळले आहेत.  शहरात आता नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे.

‘जेएनएनयूआरएम’मधील समावेशानंतर ख-या अर्थाने शहाराचा कायापालट

पिंपरी-चिंचवड शहराचा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (जेएनएनयूआरएम) समावेश झाल्यानंतर ख-या अर्थाने कायापालट झाला. पाणी, रस्ते, वाहतूक, व्यवस्थापन, जलनि:सारण, आरोग्य, ई-गर्व्हनन्स आदी प्रकल्पांसाठी भरघोस निधी मिळाला.

त्यामुळे शहराचा झपाट्याने आणि नियोजनबद्ध विकास झाला.  गावखेड्यांचे शहर अशी सुरुवातीची ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक भागात प्रशस्त रस्ते, भव्य उड्डाणपूल, उंच इमारती, मोठे प्रकल्प होत असल्याने शहराचे रूपडे पालटले आहे.

25  लाख लोकसंख्येच्या शहरातील या विकासात्मक बदलाची  केंद्र तसेच राज्य सरकारनेही दखल घेतली. देशभरातील 65 शहरांतून पिंपरी-चिंचवडची ‘बेस्ट सिटी’ म्हणून निवड झाली होती. त्याचप्रमाणे राज्य पातळीवरही सर्वाधिक ‘क्लीन सिटी’ म्हणून शहराचा गौरव झाला आहे.

शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्याअंतर्गत विविध विकास कामे सुरु आहेत. आगामी काळात शहर आणखी स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाईल. मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोसारख्या प्रकल्पामुळे शहराच्या नावलौकिकात भरच पडणार आहे.

ग्रीन सिटी, बेस्ट सिटी, क्लीन सिटी, स्मार्ट सिटीची बिरुदे नावावर लागल्यानंतर आता मेट्रोनगरीकडे शहराची वाटचाल सुरु आहे.

शहराची भौगौलिक रचना

पिंपरी-चिंचवड शहराचा लोकसभा, विधानसभेला स्वतंत्र मतदारसंघ नव्हता. बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होता. तर, सांगवी, ताथवडे, थेरगाव हा भाग खेड लोकसभा मतदारसंघात होता. विधानसभेला हवेली हा मतदारसंघ होता.

_MPC_DIR_MPU_II

2009 च्या मतदारसंघ पुर्नरचनेत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीन विधानसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर शहराचे महत्व राजकीय पटलावर अधोरेखित झाले. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, चिंचवडचे लक्ष्मण जगताप  आणि भोसरीचे विलास लांडे यांनी पहिल्यांदा विधानसभेत प्रतिनिधीत्व केले.

मावळ, शिरुर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. पिंपरी, चिंचवड मावळ लोकसभा मतदारसंघात तर भोसरीचा शिरुर लोकसभा मतदारसंघात समावेश झाला. तर, ताथवडेचा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. शहराची स्वतंत्र लोकसभा मतदारसंघाची मागणी आहे. ती अद्याप अपूर्ण आहे.

शहरातील लोकसंख्या वाढ

शहर विकासाचे शिल्पकार

पिंपरी-चिंचवड शहराचे नेतृत्व अण्णासाहेब मगर, शरद पवार, प्रा. रामकृष्ण मोरे, अजित पवार यांनी केले. शहर विकासाचा पाया शिल्पकार अण्णासाहेबांनी रचला.

त्यानंतर देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शहराकडे बारकाईने लक्ष दिले. हिंजवडी आयटीनगरीची स्थापना केली. एमआयडीसी आणली. त्यामुळे उद्योग, कारखानदारी वाढली. शहराचा कायापालाट होऊ लागला.

माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी शहराचे नेतृत्व केले. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय उभारले. ते आज शहरवासीयांसाठी जीवनदान देणारे ठरत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सलग दहा वर्ष शहराचा कारभार पाहिला. प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, टोलेजंग इमारती त्यांच्या पक्षाची सत्ता असताना झाल्या. त्यामुळे शहराचा कायापालट झाला.

आता भाजपच्या झेंड्याखाली आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्याकडे शहराचा कारभार आहे. मागील साडेतीन वर्षापासून शहर नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे आहे.

Interview with PCMC’s first Mayor Dnyaneshwar Landage: पदाधिकारी चाचपडायला लागला की अधिकारी फायदा घेतात – ज्ञानेश्वर लांडगे

 शहरातील राजकीय स्थित्यंतरे

शहरात महापालिका एकमेव मोठे सत्ताकेंद्र आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर अनेक वर्ष काँग्रेसचे वर्चस्व होते. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत काँग्रेसची एकहाती सत्ता होती.

सन 1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेल्या अजित पवार यांनी शहरात लक्ष घालण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून मोरे आणि पवार यांच्यात शह-काटशहाचे राजकारण होत होते.

1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर झालेल्या पालिकेच्या 2002 च्या निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नाही.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करुन पालिकेवर सत्ता गाजविली. पहिल्यांदाच काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली नव्हती.

त्यानंतर काँग्रेस क्षीण होत गेली. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर अनेकांनी राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. 2007 आणि 2012 च्या झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. सलग दहा वर्ष अजितदादांनी शहराचे नेतृत्व केले.

विधानसभेच्या 2014 निवडणुकीत राज्यातील समिकरणे बदलली. तशी शहरातील देखील बदलली. अजितदादांनी जे पेरले तेच उगविण्यास सुरुवात झाली. एकेकाळी उजवा हात अशी ओळख असलेल्या लक्ष्मण जगताप यांनी दादांची साथ सोडली. भाजपचे शहरातील पहिले आमदार म्हणून ते निवडून आले. आमदार महेश लांडगे, माजी महापौर आझम पानसरे यांनीही कमळ हाती घेतले.

या त्रिमूर्तींनी ‘नको बारामती, नको भानामती’, ‘शहरातील निर्णय शहरातच’ असा नारा देत 2017 च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पर्यायाने अजितदादांना धोबीपछाड दिला. राष्ट्रवादीचे संस्थान खालसा केले. महापालिकेवर भाजपचे कमळ फुलविले. भाजपची एकहाती सत्ता आणली.

आमदार जगताप आणि लांडगे शहराचा कारभार करत आहेत. आता आझम पानसरे पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात गेले आहेत. आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. पालिकेचा गड भाजप राखते की राज्यात पुन्हा सत्तेत आलेले अजितदादा पालिका ताब्यात घेतात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सर्व सुख-सोयी सुविधांनीयुक्त स्मार्ट शहर म्हणून घडविण्यासाठी महापालिका कार्यतत्पर – आयुक्त हर्डीकर  

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहर हे झपाट्याने वाढणारे आणि नागरिकांना, उद्योगांना चांगली जीवनशैली, कर्मभूमी उपलब्ध करुन देणारे शहर म्हणून नावारुपाला येत आहे. या विकासप्रक्रियेत महापालिकेचे योगदान मोठे राहिलेले आहे. भविष्यातही पिंपरी-चिंचवडशहर देशामधील अग्रणी, जणण्यायोग्य शहर आणि आर्थिकदृष्ट्या उन्नत असे सर्व सुख-सोयी सुविधांनीयुक्त स्मार्ट शहर म्हणून घडविण्यासाठी महापालिका कार्यतत्पर राहील. सध्याच्या जागतीक महामारीला समर्थपणे तोंड देवून, सर्व शहरवासीय आपले आरोग्य आणि जीवनशैली अबाधित राखतील. समर्थ, सक्षम, नागरिक घडविण्यासाठी पालिकेला साथ देतील, असा विश्वास आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.