PCMC Anniversary: पिंपरी-चिंचवड एक समृद्ध संपन्न शहर…

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाली तर महानगरपालिकेच्या स्थापनेला 38 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने शहराच्या सर्वांगीण वाटचालीचा वेध घेणारा श्रीकांत चौगुले यांचा विशेष लेख…

——————————————————

पिंपरी-चिंचवड एक समृद्ध संपन्न शहर…

प्रशस्त रस्ते, टोलेजंग इमारती, नागरी सोयीसुविधा .या सर्वांमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेले एक सुंदर शहर म्हणजे पिंपरी चिंचवड .अवघ्या दोन-तीन दशकांपूर्वी पुणे शहरावर अवलंबून असणारे ,पुणे शहराचे एक उपनगर वाटावे ,असे पिंपरी-चिंचवड पण बघता बघता  एक स्वयंपूर्ण शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचा विकास झाला.

झपाट्याने झालेला हा विकास अचंबित करणारा आहे .सध्यातरी नवख्या माणसाला पुणे शहर कुठे संपले आणि पिंपरी-चिंचवड कुठे सुरू झाले ,हे सांगता येत नाही. इतकी दोन शहरातील एकरूपता झाली आहे. पण दोन शहरातील बदल मात्र नजरेत भरणारा आहे.

पुण्याहून निघाल्यावर बोपोडीच्या पुढे किंवा औंधच्या पुढे ,नदीपार केल्याकेल्या दिसणारा प्रशस्त रस्ता . पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून आलेल्या माणसाला त्यामानाने मोकळा आणि प्रशस्त रस्ता बघून पहिल्यांदा हायसे वाटते. इथेच पिंपरी-चिंचवडची वेगळी ओळख सुरू होते.

प्रशस्त रस्ते व डोळ्यांना सुखावणारी वृक्षराजी 

पिंपरी-चिंचवडमधील प्रशस्त रस्ते, रस्त्याच्या कडेचे सुशोभीकरण, डोळ्यांना सुखावणारी वृक्षराजी. तसेच कमीत कमी सिग्नल, म्हणजेच सिग्नल टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी, निर्माण केलेले उड्डाणपूल. रस्त्यातील ग्रेड सेपरेटर, त्यामधील सुशोभीकरण. या सर्व बाबी खूप छान वाटतात. पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत रचना खूपच चांगली वाटते.

शहरातील वाहतूक व्यवस्था सध्या तरी अन्य शहरांच्या तुलनेत फार चांगली आहे. त्याचे कारण म्हणजे शहरातील मुख्य रस्ते व अंतर्गत रस्ते यांचे जाळे. शहरात बीआरटीएस रस्ते व अन्य रस्ते यामुळे वाहतूक सुलभ आणि सुसह्य झाली आहे. बीआरटीएस रस्त्यामध्ये दापोडी ते निगडी, नाशिक फाटा ते वाकड, औंध ते रावेत, काळेवाडी फाटा ते देहू आळंदी, दिघी ते आळंदी, वाकड मार्गे जाणारा बाह्यवळण मार्ग. प्राधिकरण ते भोसरी स्पाईन रोड.

यापैकी अनेक मार्ग हे 61 मीटर इतके रुंद आहेत. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर घालण्याबरोबरच शहराची जीवनवाहिनी ठरण्याचे काम या मोठ्या रस्त्याने केले आहे. याचबरोबर नाशिक रस्ता, निगडी ते भोसरी रस्ता, असे अनेक रस्तेही महत्त्वाचे आहेत. या मुख्य रस्त्याबरोबरच अंतर्गत रस्तेही तितकेच पूरक आणि महत्त्वाचे आहेत. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पूल आहेत.

कासारवाडी येथील वैशिष्ट्यपूर्ण जेआरडी टाटा उड्डाणपूल 

त्यापैकी कासारवाडी येथील म्हणजेच नाशिक फाट्याचा हा पूल शहराचा लौकिक वाढवणार आहे. हा दुमजली पूल आहे.  या पूलाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी नदी, रेल्वे मार्ग ,महामार्ग पार करतो. यावरची विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी खूपच छान दिसते. तसेच औंध-रावेत मार्गावरील पवना नदीवरील बास्केट ब्रिज खूपच सुंदर आहे .भोसरी, एम्पायर इस्टेट, पिंपरी ,चापेकर चौक व शहरात अनेक ठिकाणी साधारण एक ते दोन किलोमीटर लांबीचे पूल आहेत.

उत्तम रस्ते हे पिंपरी-चिंचवडचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणावे लागेल . यातच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही उत्तम आहे असे म्हणावे लागेल. कारण बीआरटी मार्गावरील बस व्यवस्था, शहराच्या मध्यातून जाणारा रेल्वे मार्ग, त्यावरील पुणे लोणावळा लोकल सेवाही उत्तम आहे.

जुना पुणे-मुंबई रस्ता व वाकड मधून जाणारा बाह्यवळण रस्ता असे दोन्ही मार्गही शहरातून जातात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने उत्तम आणि सोयीस्कर ठरते. याचबरोबर शहरासाठी वल्लभनगर येथे स्वतंत्र बस स्थानक आहे. शहरात दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड आकुर्डी अशी रेल्वे स्थानके आहेत.

एकंदरीत शहरांतर्गत आणि शहराबाहेरील सुरळीत, व्यवस्थित वाहतूक व्यवस्था आहे.या बाबी शहरातील औद्योगिक विकासाला आणि शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या ठरल्या आहेत.

औद्योगिकीकरणाला चालना 

पुणे शहरालगतचा औद्योगिक परिसर, अशीच पिंपरी-चिंचवडची सुरुवातीला ओळख होती. त्याचे कारणही तसेच होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर, महाराष्ट्रात औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. मुंबई नंतर पुणे हे औद्योगिक विकासासाठी सोयीस्कर होते. पुणे शहरालगत वाहतूक दृष्ट्या सोयींची आणि मोकळी माळरानाची जागेची उपलब्धता याच भागात होती.

या दोन कारणांमुळे 1954 पासून या परिसरात औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. सुरुवातीला एच ए, त्यानंतर सँडविक, एसकेएफ, बजाज अशा कंपन्या या परिसरात सुरू झाल्या. त्यानंतर एमआयडीसीने सुनियोजित औद्योगिक वसाहतीची निर्मिती केली. त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय असे अनेक मोठे उद्योग ,कंपन्या शहरात सुरू झाल्या .याचबरोबर मोठ्या कंपन्यांवर आधारित शेकडो लघुउद्योग सुरू झाले.

या सर्वांमुळे कामगार, तंत्रज्ञ व इतर सेवा देणारे लोक या परिसरात येऊ लागले. त्यांच्या वास्तव्यासाठी ,परिसरात व्यवस्था करण्यासाठी, या भागातल्या गावागावात चाळींची, घरांची निर्मिती झाली .पण नागरी सुविधा पुरवणे इथल्या ग्रामपंचायतींना शक्य नव्हते, म्हणून मग इथल्या पिंपरी, चिंचवड ,आकुर्डी ,भोसरी या गावातील ग्रामपंचायती विसर्जित करून 4 मार्च 1970 रोजी पिंपरी चिंचवड नवनगर पालिका अस्तित्वात आली.

नागरीकरणाचा रेटा आणि एकसंध शहर 

सुरुवातीच्या काळात तर शहरात समाविष्ट झालेली ही गावे मुळात खेडेगावेच  होती. मूळ गावठाणे आणि शेती अशी ग्रामीण संस्कृती होती. नागरीकरणाच्या रेट्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी होत केले आणि नागरी वस्ती वाढत गेली. तरीसुद्धा प्रत्येक गावाचे वेगळेपण अनेक वर्षे टिकून होते. आता मात्र एकसंध शहर झाले आहे.

नगरपालिकेच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षात 1972मध्ये नवनगर विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली. सुनियोजित शहराच्या उभारणीसाठी 40 पेठांचे नियोजन होते. त्यापैकी बहुतांशी पेठा विकसित केल्या आहेत. त्यातील टुमदार ,सुंदर घरे, नियोजनबद्ध वसाहत, शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आहे. तसेच शहराच्या जडणघडणीत एमआयडीसीचेही योगदान फार मोठे आहे.

पिंपरी-चिंचवड परिसराचा झपाट्याने विकास झाला. साधारण पंचवीस वर्षांपूर्वीची या परिसराची स्थिती आणि आत्ताचे विकसित शहर यातला बदल अचंबित करणारा आहे. या परिसराचे झपाट्याने नागरीकरण होण्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत ,ती म्हणजे जागेची उपलब्धता.

नवनगर पालिकेची स्थापना आणि शहराचा विस्तार

नगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळी 38 चौरस किलोमीटर इतके क्षेत्र होते. त्यानंतर 1982 मध्ये हद्दवाढ होऊन महापालिका झाली. 1997 मध्ये पुन्हा एकदा हद्दवाढ झाली. यावेळी शहराचे क्षेत्रफळ 171 चौरस किलोमीटर इतके झाले. शहराच्या विकासासाठी भरपूर मोठे क्षेत्र उपलब्ध झाले.

पूर्वेला भोसरी चऱ्होलीपासून पश्चिमेला हिंजवडीपर्यंत आणि दक्षिणेला दापोडी, सांगवीपासून उत्तरेला देहू-आळंदीपर्यंतची हद्दवाढ झाली .या हद्दीलगतच हिंजवडी आणि तळवडे हे दोन आयटी पार्क आहेत. अलीकडच्या काळातील आयटी क्षेत्रातील भरभराटही शहराच्या विकासाला पूरक ठरली.

शहरासाठी पाण्याची उपलब्धता हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. पवना धरणातून शहराला पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने, विकासाला साह्यभूत ठरले. रोजगाराची संधी, राहण्यासाठी सोयीस्कर निवारा, सार्वजनिक सोयीसुविधा, सुरक्षितता अशा अनेक कारणांमुळे शहराचा विकास झपाट्याने झाला.

राहण्यासाठी नागरिकांची पसंती 

शहराची निर्मिती झाली तेव्हा शहराची लोकसंख्या केवळ 80 हजार इतकी होती. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख इतकी झाली. आता 25 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. यावरून या शहरात येणाऱ्या, स्थायिक होणाऱ्या लोकांची स्थिती कळते. म्हणजेच या शहराची वाढ होण्याची कारणे अनेक असली तरी लाखो लोकांनी या शहरात स्थायिक होण्यास पसंती दिली हे प्रमुख कारण आहे.

एखादे शहर विकसित होते तेव्हा लोकांच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या बाबीही महत्त्वाच्या ठरतात. लोकांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या संस्था निर्माण होणे गरजेचे असते. लोकांच्या प्राथमिक गरजांबरोबरच चांगल्या शैक्षणिक संस्था, मनोरंजन केंद्रे, वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक बागांपासून प्रार्थनास्थळांपर्यंत अनेक बाबींची पूर्तता होणे गरजेचे असते.

शैक्षणिक व सांस्कृतिक विकास 

शहरात ज्ञानप्रबोधिनीपासून डॉ. डी वाय पाटील विद्यापीठापर्यंत अनेक नामांकीत शिक्षण संस्था आहेत. वैद्यकीय सेवेच्या बाबतीत यशवंतराव चव्हाण रुग्णालय, औंध कॅम्प येथील जिल्हा रुग्णालय अशी सरकारी रुग्णालय, तसेच लोकमान्य, बिर्ला, निरामय अशी अनेक खाजगी रुग्णालये शहरात आहेत.

मनोरंजनाच्या बाबतीत सिटी प्राईड पिंपळे सौदागर, विशाल ई-स्क्वेअर पिंपरी, आयनॉक्स आकुर्डी ,कार्निवल मोशी ,पीव्हीआर चिंचवड अशी अनेक मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे  आहेत. तसेच शहरात 4 नाट्यगृहे आहेत. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड), अंकुशराव लांडगे (सभागृह भोसरी), आचार्य अत्रे रंग मंदिर (संत तुकाराम नगर), निळू फुले रंगमंदिर (पिंपळे गुरव), या नाट्यगृहात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तसेच इतर ठिकाणीही सांस्कृतिक सभागृहांचे काम चालू आहे.

शहरात अनेक सुंदर सुंदर आकर्षक बागा आहेत. साधारणपणे 150 बागा आहेत. यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे दुर्गादेवी टेकडी उद्यान, संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली, थेरगाव येथील बोट क्लब तसेच शहराचे सांस्कृतिक मानचिन्ह ठरलेले भक्ती-शक्ती शिल्प उद्यान, बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय अशी काही महत्त्वाची उद्याने आहेत.

बाजारपेठेचा विकास 

काही वर्षांपूर्वी मनोरंजन व बाजारपेठेसाठी पुणे शहरावर अवलंबून रहावे लागत होते. आता पुण्यातील अनेक नामांकित दुकाने शहरात आली आहेत. सुवर्णपेढीमध्ये पीएनजी, रांका, अष्टेकर, चंदूकाका सराफ अशी काही नावे सांगता येतील. कपड्यांच्या बाबतीत जयहिंद पासून सिलाईपर्यंतची अनेक नामांकित वस्त्रदालने शहरात सुरू झाली आहेत.

याचबरोबरीने चितळे बंधू मठाईवाले, काका हलवाई, प्रदीप स्वीट्स अशा मिठाईच्या दुकानांपासून सर्व प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण नामांकित दुकाने ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. एकंदरीत शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रापासून खवय्येगिरीपर्यंत शहरात सर्व बाबी उत्तम प्रकारच्या उपलब्ध आहेत. खरेदीसाठी सिटी वन, सेंट्रल , स्पाॅट 18, प्रीमियर प्लाझा असे अनेक मॉल आहेत.एकंदरीत समृद्ध शहरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी उपलब्ध आहेत.

शहराची भरभराट होत असताना शहराची उपनगरे मोठ्या प्रमाणात विकसित होत आहेत. त्यामध्ये पिंपळे सौदागर, वाकड परिसराचा नियोजनबद्धरीत्या विकास झालेला दिसतो. याच बरोबर रावेत ,मोशी ,चरोली आधी भाग ही झपाट्याने विकसित होत आहे.

 

शहराचे डेक्कन – पिंपळे सौदागर 

पिंपळे सौदागर भागाला तर शहराचे डेक्कन अशी उपमा दिली जाते. दहा-पंधरा वर्षांपूर्वी पिंपळे सौदागर भागात शेती होती. या भागात अनेक मोठ्या हाऊसिंग सोसायटी झाल्या. व्यापारी संकुले आली. शहरातील एक उत्तम विकसित उपनगर म्हणून ओळख निर्माण झाली. पण जेव्हा या भागाचा विकास होत होता तेव्हा पिंपळे सौदागर या नावाला वलय प्राप्त झाले नव्हते,अशा काळात बांधकाम व्यावसायिक आपल्या जाहिरातीत औंध जवळचे किंवा औंधपासून थोड्या अंतरावर असा उल्लेख करायचे. आता ती स्थिती राहिली नाही. पिंपळे सौदागरची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे .तीच स्थिती वाकडची आहे .वाकड, कस्पटे वस्ती, विशालनगर हा भागही विकसित झाला आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून, देशातील विविध राज्यातून, लोक नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरात आले. स्थायिक झाले. इथल्या मूळ निवासींची संख्या तुलनेने कमी आहे. शहरातील समाविष्ट गावे, त्यांची गावठाणे, त्यातील मंदिरे, सण-उत्सव, यात्रा-जत्रा या सर्वांमधून ग्रामजीवनातील संस्कृती अजूनही जपली जाते.

पिंपरी कॅम्पातील सिंधी लोकांनी आपली वेगळी संस्कृती जपत बाजारपेठ उभारली आहे.

तीर्थक्षेत्रांचे सान्निध्य 

शहराचे महत्त्वाचे सांस्कृतिक धार्मिक अधिष्ठान म्हणजे मोरया गोसावी मंदिर. या मंदिराची परंपरा फार मोठी आहे . सगळ्यात विशेष म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव ठरणारी देहू-आळंदी ही पुण्यक्षेत्रे. ही पिंपरी चिंचवड शहरालगत आहेत, हे एक शहराचे वैशिष्ट्यच आहे.

शहराच्या वाढ आणि भरभराटीसाठी या पुण्यक्षेत्रांचे सान्निध्य महत्त्वाचे ठरले आहे. अशा सगळ्या कारणांनी पिंपरी-चिंचवड शहराची लोकांना ओढ आहे, म्हणूनच दिवसेंदिवस लोकसंख्या वाढते आहे. शहराची वाढ होते आहे. विकास होतो आहे .म्हणूनच पुण्यातून पिंपरी-चिंचवडला स्थलांतरित होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

पुण्यातील वाहतूक समस्या, जागेची अडचण, दाट लोकवस्ती, वाढते प्रदूषण, अशा अनेक गोष्टींना कंटाळून पिंपरी-चिंचवडला प्राधान्य दिले जाते.

शहरातील वाहन उद्योगाला अधिक साह्यभूत ठरणारे ऑटॉक्लस्टर तसेच पर्यटकांची अधिक पसंती असणारे सायन्स पार्क या बाबी महत्त्वाच्या आहेत. या शिवाय शहरात भविष्यकाळात अनेक मोठमोठे प्रकल्प विकसित केले जाणार आहेत. त्यामध्ये मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र , सिंगापूरच्या धरतीवरील सफारी पार्क या बाबी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहेत.

स्वावलंबी, परिपूर्ण शहराच्या दिशेने…

सुरवातीच्या काळात पुणे शहरावर बऱ्याच गोष्टी अवलंबून होत्या. नंतरच्या काळात शहरासाठी स्वतंत्र बस स्थानक, स्वतंत्र न्यायालय, स्वतंत्र तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार, माध्यमांची, वृत्तपत्रांची स्वतंत्र कार्यालये, अशा अनेक बाबी शहरासाठी उपलब्ध झाल्या . याचबरोबर अनेक बाबी नव्याने निर्माण होत आहेत.

या सर्वाचा परिणाम शहराच्या विकासावर नक्कीच होतो आहे. शहरातील रस्त्यांच्या बाजूला तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. ही झाडी, हिरवळ सौंदर्य खुलवणारी आहे. तसेच शहराला बेस्ट सिटीचा सन्मानही प्राप्त झाला आहे.

एकंदरीत शहराची वैशिष्ट्ये, शहराचा विकासाचा वेग पाहता, पिंपरी-चिंचवड हे देशातील एक समृद्ध संपन्न उत्तम शहर ठरावे. अशीच शहराची वाटचाल सुरू आहे.

– श्रीकांत चौगुले

लेखक – पिंपरी चिंचवड गाव ते महानगर.

संपर्क – 7507779393

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.