Pimpri: महापालिका बालवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन दोन हजार रुपयांनी वाढणार

शिक्षण समितीची मान्यता

एमपीसी न्यूज – सध्याच्या महागाईचा विचार करता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका, कर्मचा-यांचे मानधन दोन हजार रुपयांनी वाढणार आहे. 212 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला शिक्षण समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या शिक्षण समितीची तहकूब सभा आज (शनिवारी) पार पडली. मनीषा पवार सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. महापालिकेच्या एकूण 207 बालवड्या आहेत. एक समन्वयक, दोन विभागीय समन्वयक आणि दोन सेविका असे एकूण 212 कर्मचारी कार्यरत आहेत. सहा वर्षांपासून त्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही. सध्याच्या महागाईचा विचार करता त्यांच्या मानधनात दोन हजार रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव सदस्या सुलक्षणा धर यांनी मांडला. त्याला निर्मला गायकवाड यांनी अनुमोदन दिले. या प्रस्तावाला एकमताने मान्यता दिली आहे.

पाच वर्षांपर्यंत सेवा झालेल्या शिक्षिकेला सध्या सात हजार रुपये मानधन असून त्यांना आता नऊ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. 10 वर्षापर्यंत सेवा झालेल्यांना आठ हजार रुपये असून आता 10 हजार रुपये मानधन मिळणार आहे. 15 वर्षापर्यंत सेवा झालेल्या शिक्षिकांचे नऊ हजाराहून 11 हजार रुपये मानधन होणार आहे. 20 वर्षापर्यंत सेवा झालेल्यांचे दहा हजाराहून बारा हजार मानधन होणार आहे. तर, 20 वर्षापुढील सेवा झालेल्या शिक्षिकांचे 11 हजाराहून 13 हजार रुपये मानधन होणार आहे. 30 वर्ष सेवा झालेल्या शिक्षिकांना 15 हजार रुपये मानधन मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावावर महासभेत शिक्कामोर्तब केले जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.