Pimpri: घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करा; आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे शहरवासीयांना पुन्हा आवाहन

शहरातील काही भाग 'मायक्रो' सील

एमपीसी न्यूज – पुणे परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातही रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे. पुण्यासारखी वेळ येऊ नये यासाठी शहरवासीयांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी घरातच थांबावे, घराबाहेर पडू नका, मास्कचा वापर करावा. ज्यांच्या घरामध्ये जागा कमी आहे. त्यांनी पुर्णवेळ मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. तसेच शहरातील काही भाग ‘मायक्रो’ सील केला आहे. नागरिक घराबाहेर पडल्यास कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढत आहे. पिंपरीत देखील आजपर्यंत 21 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी 12 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. नऊ रुग्णावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पुण्यामध्ये रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसून येत आहे. पुण्यातील काही भाग ‘सील’ केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील देखील काही भाग ‘मायक्रो’ सील केले आहेत. पुण्यासारखी वेळ येऊ द्यायची नसेल. तर, पिंपरी-चिंचवडकरांनी वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.

आत्ता नागरिकांनी घरातच थांबावा. नाहीतर संसर्ग होऊन कोरोना वाढण्याची भीती आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडू नये. मास्क वापरावा. ज्यांच्या घरामध्ये जागा कमी आहे. त्यांनी पुर्णवेळ मास्क वापरावा. वारंवार हात साबनाने धुवावेत. डोळ्याला, कानाला, नाकाला हाताचा स्पर्श करु नये, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. दरम्यान, मागील दोन दिवसात जवळपास 150 संशयितांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

शहरात आजपर्यंत 21 पॉझिटीव्ह रुग्ण, 12 जण झाले बरे!

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. त्यानंतर लागोपाठा बारा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यातील पहिले तीन रुग्ण 27 मार्च रोजी ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले. तर, 28 मार्च रोजी आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी एक आणि 2 एप्रिल रोजी एक असे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर पहिल्या बारापैकी शेवटचा रुग्ण 4 एप्रिल रोजी कोरोनामुक्त झाला. शहरात 20 मार्च रोजी कोरोनाचा शेवटचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर सलग 12 दिवस शहरातही एकही नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नव्हता.

दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात आलेल्यांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि.2) स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्या ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील एकाला शुक्रवारी (दि.3) कोरोनाची लागण झाली. त्यानंतर शनिवारी (दि.4) एकाच दिवशी सहा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. त्यामध्ये दिल्लीतून आलेल्यांच्या कॉन्टॅक्ट’मधील चार आणि खासगी रुग्णालयातील दोघे होते. यातील एक जण पुणे महापालिका हद्दीतील रहिवाशी असून तो वायसीएमएच रुग्णालयात दाखल आहे. यापैकी 12 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.