Pimpri : उड्डाणपुलावरील पोस्टर हटविण्याची जबाबदारी आरोग्य निरीक्षकांवर

विद्रुपीकरण करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश  

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील उड्डाणपूल व पालिका इमारतींवरील पोस्टर भित्तीपत्रके, जाहिराती काढण्याची जबाबदारी आता क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य  निरीक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून अनधिकृत पोस्टर लावणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. 

स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी)पार पडली. अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. शहरातील उड्डाणपूल, पालिका इमारती, सीमा भिंत यावर विनापरवाना पोस्टर, भित्तीपत्रके व जाहिराती लावल्या जातात. त्यामुळे स्मार्ट सिटी विद्रुप होत आहे. अशा प्रकारे विनापरवाना पोस्टर, भित्तीपत्रके व जाहिरात लावणारे व रंगविण्यावर पोलिसात गुन्हे दाखल करण्याचा सूचना स्थायी समितीने दीड महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, त्या संदर्भात कोणताही विभाग जबाबदारी घेण्यास पुढे येत नव्हता. त्यावरुन सदस्यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले होते.

या कारवाईची जबबादारी सह शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मागील सभेत दिली होती. मात्र, त्या संदर्भात अद्याप एकही गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भात पाहणी करून गुन्हे नोंदविण्याचा सूचना आयुक्त हर्डीकर यांनी मुख्य आरोग्य निरीक्षक व  आरोग्य निरीक्षकांना दिल्या आहेत. तसे, पत्र आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिले आहे.

विलास मडिगेरी म्हणाले, ‘पुढील सभेत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय हद्दीत एक तरी गुन्हा पोलिसांमध्ये दाखल करण्याची सक्त सूचना संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरवस्ती विकास योजनेतील शिलाई यंत्र व वाहन प्रशिक्षण योजनेतील अपात्र महिलांना 15 ऑगस्टपर्यंत एसएमएसद्वारे कळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय उल्लेखनीय कामगिरीनिमित्त ‘ऑफिसर ऑफ मंथ’ पुरस्काराने गेल्या बुधवारी सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांचा गौरव करण्यात आला आहे. मात्र, अद्याप फिरता चषक पालिका भवनात उभारण्यात आलेला नाही. त्यासंदर्भात तातडीने कारवाई करून तो चषक लावण्याचा सूचना देखील प्रशासनाला देण्यात आल्याचे’, मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.