Pimpri : ….आयुक्तांनी व्यक्त केली दिलगिरी! 

एमपीसी न्यूज – मी शहराच्या हिताचे काम करत आहे. मनोभावे काम करत असताना सर्वांचा आदर, सन्मान राखणे माझे कर्तव्य आहे. माझ्याकडून अनुचित शब्द गेले असेल. त्यातून कुणाचा अवमान झाला असेल तर मी दिलगीर आहे, असे सांगत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी वादावर पडदा टाकला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या शहर सल्लागार समितीची 31 ऑगस्ट रोजी खासदार, आमदार, पालिकेतील प्रतिनिधींच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते आणि आयुक्त यांच्यात खडाजंगी झाली होती. स्मार्ट सिटीअंतर्गत कासारवाडी आणि सेक्टर 23 येथे प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणा-या सोलर सिस्टीमधून वीज महापालिका प्रति युनीट साडेतीन रुपये या दराने विकत घेणार आहे. तर, महापालिका कचरा व राडारोड्यापासून तयार होणारी वीज साडेसहा प्रति युनीट दराने विकत घेणार आहे. याला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला होता.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोन्ही विषय वेगळे असून गफलत करु नका. अज्ञानातून असे काही बोलू नका असे उत्तर दिले होते. आयुक्तांचे उत्तर ऐकून विरोधी पक्षनेते दत्ता साने संतापले. आक्रमक होत त्यांनी आयुक्तांवर हल्लाबोल करत बैठकीतून काढता पाय घेतला होता.

आज झालेल्या महासभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी डोक्याला काळीपट्टी  बांधून महासभेत बसून आयुक्तांचा निषेध केला. राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर म्हणाले, आयुक्त शहराचे असतात. त्यांच्या वक्तव्यातुन नगरसेवकांचा निषेध होत असेल तर मी आयुक्तांचा निषेध करतो.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी विरोधी पक्षनेते आणि आयुक्तांना आपली बाजू मांडण्याची विनंती केली. त्यानंतर साने यांनी बैठकीत घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि आयुक्त यांच्यातील वादावर पडदा पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.