Pimpri: कोरोनाच्या जलद टीममधील शिक्षकांची दांडी; प्रत्येकी पाचशे रुपये दंड

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलद प्रतिसाद पथकातीत दांडी मारणा-या दोन शिक्षकांवर आयुक्तांनी कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत दोघांवर प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे महापालिकेतील कर्मचा-यांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे.

संजय दगडू धोत्रे आणि संदीप एकनाथ शेळके अशी दंडात्मक कारवाई केलेल्या उपशिक्षकांची नावे आहेत. महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याला अटकाव करण्यासाठी जलद प्रतिसाद टीमची स्थापना केली आहे. त्यामध्ये महापालिका शिक्षण विभागातील शिक्षकांच्याही नेमणूका केल्या आहेत. कोरोनाचे कामकाज राष्ट्रीय आपत्तीत मोडत आहे. त्यामुळे नेमणूका केलेल्या कर्मचा-यांनी कोणतेही कारण न सांगता प्रामाणिकपणे कामकाज करणे अपेक्षित होते.

या महत्वपुर्ण कामकाजात धोत्रे आणि शेळेक हे दोन शिक्षक गैरहजर राहिले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली असता धोत्रे यांनी खुलासा केला. परंतु, तो संयुक्तिक नाही. तर, शेळके यांनी खुलासाच केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रत्येकी पाचशे रुपये दंडाची कारवाई केली आहे. त्यांच्या नजीकच्या वेतनातून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. तसेच भविष्यात राष्ट्रीय कामकाजात गैरहजर राहणे, टाळाटाळ केल्यास जबर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यांच्या सेवापुस्तकात या आदेशाची नोंद केली जाणार आहे.

दरम्यान, महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांऐवजी पाच टक्के ठेवण्याचा आदेशही आयुक्तांनी विभागप्रमुखांना दिला आहे. आपत्कालीन, अतिमहत्वाचे, अत्यावश्यक सेवा, कोरोना कामकाजाकरिता नियुक्त्या केलेल्या कर्मचा-यांना हा आदेश लागू राहणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.